महिलांच्या हातात सुईदोरा

केवल जीवनतारे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

धुणीभांडी करणाऱ्या महिलांना स्वावलंबनासाठी प्रशिक्षण

धुणीभांडी करणाऱ्या महिलांना स्वावलंबनासाठी प्रशिक्षण

नागपूर - कपाळावर कुंकू आहे, परंतु घरधन्याचा फारसा आधार नाही. घरात खाणारी तोंडे पाच. हमखास मिळकत होईल, असे काम हाताशी नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा...हा सवाल रोजचाच. जगणे कठीण झाले. लेकरांना जगवण्यासाठी उजाडण्यापूर्वीच पहाटेला या महिला घर सोडतात. पाच घरातील धुणीभांडी करण्यासाठी पायाला चाकं लावल्यागत त्या या घरातून त्या घराच्या दिशेने धावतात. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अशा एक-दोन नव्हे तर कित्येक महिलांना प्रशिक्षणातून ‘स्वंयसिद्धा’ बनवण्यासाठी ‘वैशाली बचतगट’ सरसावला आहे. विशेष असे की, प्रशिक्षण देण्यासाठी आवश्‍यक वस्तूही उसनवारीवर आणल्या आहेत. 

शहराच्या सीमेवरचा चिंचभुवन परिसर. या भागात सात-आठ महिलांनी मिळून ‘वैशाली बचतगट’ तयार केला. या भागातील महिलांना बचतगटाशी जोडताना या महिलांचे जगणे म्हणजे त्यांच्या पाचवीला पुजलेला संघर्ष दिसून आला.

महिलांच्या जगण्यातील संकट दूर करण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्‍वास पेरण्याचे काम बचतगटाच्या वैशाली सोनुने, वैशाली जोशी, वंदना ढोके, फिरोज शेख, संध्या कुमरे, रेशमा शेख यांनी सुरू केला. संघर्षातून हळूहळू वाट शोधत या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी वैशाली बचतगट काम करीत आहे. या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी या गटाने ब्युटी पार्लर प्रशिक्षण, कुकिंग प्रशिक्षण घेण्यापासून तर सरबत तयार करण्याचेही प्रशिक्षण देण्याचे वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. दिवसभर मोलमजुरी करणाऱ्या, धुणीभांडी करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण उपलब्ध करून देण्यासाठी गरीब महिलांचे वाढदिवस साजरे करण्यापासून तर महिलांचा आनंदमेळावा घेण्याचे काम वैशाली सोनुने बचतगटाच्या माध्यमातून करीत आहेत. कोणतेही मानधन न घेता वैशाली जोशी, नलिनी हरडे, रेणुका महाजन या महिला प्रशिक्षणाचे धडे देत आहेत, हे विशेष.

घरोघरी वणवण आणि नंतर प्रशिक्षण 
प्रशिक्षणात सहभागी असलेल्या महिलांना कोणतेही शास्त्रीय शिक्षण आणि प्रशिक्षण नाही. परंतु घरातील सुईदोरा हातात घेऊन जुन्या कपड्यांचे झबले, फ्रॉक तयार करण्यासाठी त्या रात्ररात्र जागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी धुणीभांडी करण्यासाठी घरोघरी जातात. तर दुपारी दोननंतर या साऱ्या महिला शिलाईचे प्रशिक्षण घेण्यासाठी चिंचभुवनातील समाजभवनात एकत्र येतात. दिवसभराच्या श्रमाने आलेला थकवा चेहऱ्यावर दिसत असला तरी, शिलाई प्रशिक्षणासाठी या महिलांचे हात शिवशिवतात...

उसनवारीवर शिलाई यंत्र
नुकतेच चिंचभुवन परिसरातील ८६ महिलांना संघटित करून त्यांना शिलाईचे प्रशिक्षण देण्याचे काम महिनाभरापासून वैशाली बचतगटाने सुरू केले. प्रशिक्षणात येणारी महिला धुणीभांडी करणारी आहे, कुणी घटस्फोटित आहे. आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या महिला नित्यनियमाने प्रशिक्षणासाठी येत आहेत. या महिलांना शिकवण्यासाठी ‘शिलाई’ मशीन नव्हते. यामुळे एका परिचयाच्या व्यक्तीकडून उसनवारीवर आणली आहे, असे वैशाली सोनुने यांच्याशी केलेल्या चर्चेतून पुढे आले. कौशल्य विकासाच्या शेकडो योजना असतानाही या महिलांपर्यंत विकासाची एकही योजना अद्याप पोहोचली नाही. 

महिलांच्या स्वावलंबनासाठी ‘सकाळ स्वयंसिद्धा अभियान’ 

आजपासून नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत  

महिला ‘स्वावलंबी’ होण्याच्या प्रक्रियेत समाजानेही खारीचा वाटा उचलावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी माँ जिजाऊ जयंतीदिनी ‘स्वयंसिद्धा’ अभियानाचा प्रारंभ केला. त्याअंतर्गत प्राधान्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांना मदत देण्यासाठी ‘सकाळ’ने या अभियानातून पुढाकार घेतला. त्याअंतर्गत शेकडो महिलांना सहृद्य समाजाने मदत केली. हे अभियान आजपासून नागपूर शहरासह, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही सुरू करीत आहोत. स्वावलंबी होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना आत्मबळ देणे, स्वयंरोजगार उभारता यावा यासाठी आवश्‍यक साहित्य लोकसभागातून देणे, प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे आदींसाठी ‘स्वयंसिद्धा’ अभियानातून प्रयत्न केले जातील. यासाठी आधीपासूनच प्रयत्न करणाऱ्या सेवाभावी संस्था, संघटना आणि व्यक्तींनाही या अभियानात सहर्ष सामील केले जाईल.