बुलेटवाल्यास दिले स्कूटीचे ई-चालान!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नागपूर - वाहतूक शाखेचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. नुकताच एका बुलेटचालकाला स्कूटीवर बसलेल्या दोन महिलांचे फोटो असलेले चालान प्राप्त झाले. दुसऱ्या प्रकरणात एक युवक झाडाखाली दुचाकीवर बसला असताना त्याचे फोटो काढून ई-चालान पाठविण्याचा प्रताप वाहतूक पोलिसांनी केला. 

नागपूर - वाहतूक शाखेचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. नुकताच एका बुलेटचालकाला स्कूटीवर बसलेल्या दोन महिलांचे फोटो असलेले चालान प्राप्त झाले. दुसऱ्या प्रकरणात एक युवक झाडाखाली दुचाकीवर बसला असताना त्याचे फोटो काढून ई-चालान पाठविण्याचा प्रताप वाहतूक पोलिसांनी केला. 

गेल्या काही दिवसांपासून नागपूर पोलिस विभाग बराच वादात आणि चर्चेत आहेत. त्यातही वाहतूक पोलिसांनी मजल मारली आहे. रस्त्यावरील वाद किंवा वाहनचालकांसोबत हुज्जत घालणे नेहमीचेच असताना आता ई-चालान पाठवितानाही सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास वाहतूक पोलिस देत आहेत. यामध्ये केवळ वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे कामावर होणारे दुर्लक्ष कारणीभूत आहे. कैलास बालपांडे (रा. सोमलवाडा) यांच्याकडे बुलेट (एमएच ३१-ईटी ६०७०) आहे. त्यांच्याकडे हेल्मेटसुद्धा आहे.

मात्र, त्यांच्या घरी अचानक एक युवती व मागे बसलेली महिला असा फोटो असलेल्या स्कूटीचे ई-चालान आले. तो फोटो महाल चौकात वाहतूक पोलिसांनी काढल्याचे चालानवर दर्शवत होते. ते ई-चालान आईच्या हाती मिळाल्याने आईने युवती व महिलेबाबत विचारले. त्यांनी युवतींना ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र, आईचा विश्‍वास बसत नव्हता. त्यावेळी कैलास यांनी चालान निरखून पाहिले. स्वतःच्या बुलेटचा क्रमांक चालानवर होता.

मात्र, दुचाकी भलतीच होती. त्यांना आश्‍चर्य वाटले. चालान न भरल्यास १५ दिवसांत गुन्हेगारी स्वरूपाची कारवाईसुद्धा होणार असल्यामुळे ते घाबरले. त्यांनी वाहतूक शाखा चेम्बर तीनमध्ये संपर्क साधला. मात्र, तेथील वाहतूक कर्मचाऱ्यांनी चूक मान्य न करता दमदाटी करीत पैसे भरण्यास सांगितले. त्यामुळे दुचाकी स्वतःची नसतानाही दुसऱ्याने वाहतुकीचा नियम मोडल्याचा दंड भरण्याची वेळ कैलासवर आली आहे.

दुचाकीवर बसण्याचाही दंड
अनंतनगरात राहणारा युवक धरमराजसिंग ठाकूर या युवकाने लॉ चौकात रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली दुचाकी उभी केली होती. दुचाकीवर तो बसून होता. दरम्यान, तेथे एक वाहतूक पोलिस कर्मचारी आला. त्याने दुचाकीचा फोटो काढला. त्या युवकाला ई-चालान आले. दुचाकी न चालवता केवळ बसण्याचा ५०० रुपये दंड वाहतूक शाखेच्या चेम्बर दोन कार्यालयाने केला.

पोलिसांनी गांभीर्य राखावे
वाहतूक पोलिस कर्मचारी वाहतूक नियंत्रित न करता केवळ फोटो काढत राहतात. तर काही जण रस्त्याच्या कडेला सावज शोधत असतात. सायंकाळी कार्यालयात मोबाईलचे फोटो एकत्र दिले जातात. कार्यालयात संगणकावर काम करणारे पोलिस कर्मचारी वेळकाढू धोरण अवलंबत गांभीर्य दाखवत नाहीत. त्यामुळे चालान पाठवताना गडबड होत आहे.