नागपूर : स्फोटाने जीपीओ हादरले

कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, पार्सल हाताळताना झाला ब्लास्ट
Nagpur Blast in GPO in Explosion in parcel
Nagpur Blast in GPO in Explosion in parcelsakal

नागपूर : शहरातील सिव्हिल लाइन्स भागातील विभागीय आयुक्त कार्यालय जवळ असलेल्या जनरल पोस्ट ऑफीस (जीपीओ) मध्ये एका पार्सलमधून अचानक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. स्फोट झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

नाशिकवरून एक पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठविण्यात आले होते. त्या पार्सलमधून स्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे. या स्फोटात कुणीही जखमी झाले नसले तरी अशा प्रकारची घटना पहिल्यांदा झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. प्राप्त माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील भद्रकाली पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी त्यांचे देवळी (जि. वर्धा) येथे राहणारे मित्र राजेश बकाणे यांच्यासाठी हे पार्सल पाठविले होते. ठाकूर यांनी धुळे येथून स्फोटक खरेदी केले होते. सोमवारी सायंकाळी नाशिक येथून स्फोटकांचे पार्सल त्यांनी बुक केले.

हावडा मेलने हे पार्सल मंगळवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावरील आरएमएस कार्यालयात आले. त्यानंतर सायंकाळी टपाल वाहनातून हे पार्सल जीपीओमध्ये आणण्यात आले. उद्या बुधवारी सकाळी हे पार्सल वर्धेला देवळी येथे जाणार होते. नाशिकवरून आलेले पार्सल जीपीओच्या पार्सल हबमध्ये पोहोचले. कर्मचारी त्याला हाताळत असताना अचानक त्यामधून छोटा स्फोट झाला. स्फोट झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. कार्यालय परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची सूचना पोलिस नियंत्रण कशाला देण्यात आली. सीताबर्डी पोलिसांचा ताफा, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. स्फोट झालेले पार्सल तपासले असता त्यामध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळविण्यासाठी जे अल्प ते मध्यम प्रतीचे स्फोटक वापरले जातात ते असल्याचे तपासात पुढे आले. घातपाताची शक्यता नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. पोलिसांनी संबंधित स्फोटके जप्त केली.

पार्सल पाठविणाऱ्या पीआय ठाकूरशी साधला संपर्क

माकड किंवा पक्षांना पळविण्यासाठी बंदुकीत बार भरण्यासाठी स्फोटक वापरतात. त्याचा मोठा आवाज झाल्याने पक्षी व माकड पळून जातात. छोट्या टिकलीसारखे हे बार होते. या बारचे १० पॅकेट पार्सलमध्ये आले होते. पार्सल पाठविणारे पीआय ठाकूरशी पोलिसांनी संपर्क साधला. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांशीसुद्धा पोलिसांनी चौकशी केली. पोस्टल ॲक्टनुसार अशाप्रकारे ज्वलनशील पदार्थ पाठविण्याबाबत चौकशी सुरू असल्याचे सीताबर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी सांगितले.

‘जीपीओ’ हा व्हीव्हीआयपी परिसराचा भाग

जनरल पोस्ट ऑफिस सिव्हिल लाइन्स परिसरात आहे. येथून जवळच विभागीय आयुक्त कार्यालय आणि मंत्र्यांचे बंगले असलेले रविभवन हे सर्किट हाऊस आहे. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घरही जनरल पोस्ट ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अशा व्हीव्हीआयपी ठिकाणी परिसरात स्फोट होणे ही गंभीर बाब समजल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com