'अभ्यास'पूर्ण मेहनतीची राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

प्रांतिक देशमुखच्या "मातीतील कुस्ती'ला रजत कमळ

प्रांतिक देशमुखच्या "मातीतील कुस्ती'ला रजत कमळ
नागपूर - यवतमाळच्या प्रांतिक देशमुखने "मातीतील कुस्ती' या लघुपटासाठी फिल्मफेअरपाठोपाठ आता राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवून विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी सकाळी झाली. एखाद्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पुण्यातील एका जुन्या आखाड्यात मातीत खेळली जाणारी कुस्ती आणि पहिलवानांची व्यथा अतिशय कमी वेळात मांडण्याची किमया प्रांतिकने केली होती. "बेस्ट फिल्म (एक्‍सप्लोरेशन/ ऍडव्हेंचर/स्पोर्टस)' या गटात "मातीतील कुस्ती'ची 64 व्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. रजत कमळ आणि निर्माता व दिग्दर्शक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणाऱ्या वैदर्भी कलावंतांच्या यादीतही यानिमित्ताने प्रांतिकचा समावेश झाला आहे.

भारतातील परंपरागत कला प्रकारांपैकी एक असलेली मातीतील कुस्ती काळाच्या ओघात नष्ट होत आहे. नवी पिढी मॅटवरील कुस्तीकडे वळली आहे. "मातीतील कुस्ती' या लघुपटात पहिलवानांची कथा चित्रीत करण्यात आली आहे. 234 वर्षांची परंपरा असलेल्या पुण्यातील चिंचेची तालीम या ठिकाणी लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले. प्रांतिकने अभ्यासक्रमाअंतर्गत सादर केलेली ही कलाकृती होती. 2015-16 च्या चौथ्या सत्रात अभ्यासाचा भाग म्हणून त्याने याची निर्मिती केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागाने आखून दिलेल्या स्थळ-वेळेच्या कठोर मर्यादा पाळून चौदा ते सोळा तासांत चित्रीकरण झाले. प्रांतिकच्या अभ्यासपूर्ण मेहनतीने आज राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेतली आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत, अशी भावना त्याचे वडील प्रो. विवेक देशमुख व्यक्त करतात. प्रांतिक सध्या यवतमाळला असून, आज सकाळी दूरचित्रवाहिनीवर पत्रकार परिषदेतून राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होत असतानाच "मातीतील कुस्ती'ची घोषणा झाली आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

माझ्यासाठी हे यश अनपेक्षित आहे. आधी फिल्मफेअर आणि आता सर्वोच्च व प्रतिष्ठेचा समजला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंद होतोय.
- प्रांतिक देशमुख, दिग्दर्शक

Web Title: national award study hard climb