कारवाईचे श्रेय "सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार

Sharad-Shelar
Sharad-Shelar

नागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस वर्षांच्या इतिहासातील पहिली एवढी मोठी कारवाई असून, ती दंडकारण्य क्षेत्रात करण्यात आलेली देशातील सर्वांत मोठी कारवाई आहे आणि याचे मोठे श्रेय "सी-सिक्‍स्टी' पथकाचे आहे,' असे मत नक्षलवादविरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी "सकाळ'बरोबर बोलताना व्यक्त केले.

यापूर्वी कल्लेड येथे केलेल्या कारवाईत सिरोंचा दलम संपले होते. बोरियातील कारवाईने पेरमिली दलम संपले आहे. त्यामुळे अहेरीतील बहुतांश भाग नक्षलवादमुक्‍त झाला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी पोलिसांना शरण यावे व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

एटापल्ली व भामरागड तालुक्‍यांच्या सीमेवरील ताडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोरिया जंगल परिसरात रविवारी (ता. 22) पोलिसांनी तब्बल 16 नक्षलवाद्यांना टिपले. नक्षलवाद्यांविरुद्धची देशातली ही दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी अशी मोठी कारवाई आहे. देशाच्या दंडाकारण्यातील व महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतच्या नक्षलवादविरोधी मोहिमांमध्ये ही अव्वल क्रमांकाची मोहीम ठरली आहे.

आम्ही नक्षलवाद्यांना कुठेही घुसून ठार करू शकतो, हे आमच्या "सी-सिक्‍स्टी' पथकाच्या पोलिस जवानांनी सिद्ध केले. यातून पोलिस विभागाचे कौशल्य व क्षमता अधोरेखित झाली आहे, असे शेलार म्हणाले.

या मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, 'या मोहिमेत पेरमिली दलम कमांडर तथा नक्षलवादी चळवळीचा विभागीय सदस्य साईनाथ व विभागीय सदस्य सिनू यांच्यासह दोन दलमप्रमुख मारले गेले, त्यामुळे या यशाची व्याप्ती वाढली आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या "सी-सिक्‍स्टी' कमांडो पथकाने अभूतपूर्व शौर्याचा परिचय दिला आहे. या पथकातील सारेच कमांडो देश व पोलिस विभागाप्रती समर्पित आहेत. ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर असून, कोणत्याही परिस्थितीत लढण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आम्हीही या जवानांची विशेष काळजी घेतो. या वर्षभरात 43 कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. एका कर्मचाऱ्याला उपनिरीक्षकपदी बढती दिली आहे.''

जवानांना प्रोत्साहन
ते म्हणाले, की आम्ही आमच्या जवानांना वेळोवेळी भेटतो, त्यांच्याशी संवाद साधतो, समस्या जाणून घेतो, त्यांना सतत प्रोत्साहित करतो. पोलिस महासंचालक सतीश माथूर, उपमहासंचालक कनकरत्नम, उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी जवानांच्या सतत संपर्कात असतो. वरिष्ठ स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत एकोप्याची, समन्वयाची भावना विकसित करण्यात आल्याने अशा मोठ्या मोहिमा यशस्वी करणे शक्‍य होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी आदी अधिकाऱ्यांचेही कार्य उत्कृष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com