विद्यार्थी लेट, पण 'नीट' शांततेत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

वेळेच्या नियमात सूट 
गतवर्षी साडेनऊनंतर एक मिनिटही उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात मनाई करण्यात आली होती. मात्र, यावर्षी बऱ्याच परीक्षा केंद्रावर पाच ते दहा मिनिटे सुट देण्यात आल्याचे चित्र दिसले. यावेळी भारतीय विद्या भवन, सेंटर पॉईन्ट, आंबेडकर कॉलेज, आरएस मुंडले आणि इतर केंद्रावरही ही सूट देण्यात आल्याचे समजते.

नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे साडेनऊच्या आत परीक्षा केंद्रावर रिपोर्टींग करण्याच्या सूचना केल्या असताना, बरेच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर लेट पोहचण्याच्या घटना घडल्या. दरम्यान मंडळाकडून प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या भरगच्च नियमांच्या त्रास विद्यार्थ्यांना झाला. मात्र, एकंदरीत परीक्षेदरम्यान कुठलाही गोंधळ झाला नसल्याने यंदाची "नीट' शांततेत पार पडली. 

शहरातील 53 केंद्रांवर सीबीएसईद्वारे "नॅशनल इलिजिबिलीटी कम इंटरन्स टेस्ट'चे (नीट) आयोजन करण्यात आले होते. यासाठी सकाळी साडेसात ते साडेनऊदरम्यान केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहचायचे होते. नागपुरात छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विभागाच्या सहा जिल्ह्यातील पंचविस हजारावर विद्यार्थ्यांचा समावेश होता.

सकाळी आठ वाजतापासूनच केंद्रावर पालक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान प्रवेशपत्रावर दिलेल्या नियमानुसार केंद्राबाहेरच विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. यानंतरही मुली केसात पिन, कान व नाकातील रिंग आणि गळ्यात चेन घालून येताना दिसत होत्या. शिवाय बरेच विद्यार्थी बेल्ट आणि पाकीट घेऊन आत शिरण्याचा प्रयत्न करीत होते. केंद्रावर असलेले अधिकारी त्यांना वारंवार सूचना देत असल्यावरही विद्यार्थी आणि पालक त्यांच्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून आलेत. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य पालकांजवळ ठेवून केंद्रामध्ये सोडण्यात आले. मात्र, यावेळी कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता. 