पोस्टरबाजीऐवजी सोनेगाव तलावातील गाळ उपसणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

वाढदिवसाला भाजप देणार गडकरी यांना अनोखी भेट
नागपूर - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोनेगाव तलावातील गाळ लोकसहभागातून उपसून त्यांना वाढदिवसाची आगळीवेगळी भेट देण्याचा संकल्प दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

वाढदिवसाला भाजप देणार गडकरी यांना अनोखी भेट
नागपूर - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोनेगाव तलावातील गाळ लोकसहभागातून उपसून त्यांना वाढदिवसाची आगळीवेगळी भेट देण्याचा संकल्प दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

याकरिता रविवारी 21 ते 28 एप्रिल आठ दिवस सोनेगाव तलाव सफाई अभियान राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी जाहीर केले.

गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी करण्याऐवजी काहीतरी चांगले आणि विधायक काम करण्याचा मानस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून समोर आला. मागील वर्षी आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. तब्बल 30 हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला. यामुळे यंदा सोनेगाव तलावाची स्वच्छता आणि गाळ उपसण्याचा निर्णय घेण्यात आला.

तलावातील तब्बल पाच हजार ट्रक गाळ काढला जाणार आहे. याकरिता सात पोकलेन, जेसीबी आणि 40 टिप्परची व्यवस्था करण्यात आली आहे. तलावाच्या सभोवताल वृक्षारोपण करून हिरवळ निर्माण केली जाणार आहे. या मोहिमेत दक्षिण-पश्‍चिममधील 15 हजार नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. रविवारी (ता. 21) सकाळी साडेसात वाजता सोनेगाव तलाव स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजेय संचेती, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार आणि शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. तलावातील गाळ परिसरातील खोलगट पटांगणे, लंडन स्ट्रीटवरील खड्ड्यांमध्ये टाकला जाणार आहे. शेतकरी आणि ज्यांना उद्यानांसाठी गाळ हवा आहे तो त्यांना मोफत दिला जाणार आहे. तलावाच्या भिंती ठिकठिकाणी फुटल्या असल्याने गळती होते. उन्हाळ्यात तलाव कोरडा होतो. येथील लीकेज शोधून काढण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचे सेवानिवृत्त संचालक तसेच चेतन बंधाऱ्याचे निर्माते चेतन गजभिये व त्यांच्या चमूची मदत घेण्यात येत आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग जागृती
मोहिमेदरम्यान, घरोघरी जाऊन भाजपचे कार्यकर्ते रेन वॉटर हार्व्हेस्टिंगविषयी जागृती करणार आहेत. तब्बल 15 हजार नागरिकांना भेटून त्यांना याची माहिती दिली जाणार आहे. याबाबतची पत्रकेही वाटप केली जाणार आहेत. एवढेच नव्हे तर जे यास इच्छुक असतील त्यांना एजन्सीचे मोबाईल क्रमांकही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.