शोरूमवर झळकले ‘नो स्टॉक’ फलक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ इंजीन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीवर आजपासून बंदी घातल्याने वाहन कंपन्यांनी भरघोस सूट जाहीर केली. शहरातील सर्वच दुचाकी वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांनी गुरुवारी दुपारपासून गर्दी केल्याने साठा संपला. त्यामुळे ‘नो स्टॉक’ असे बोर्ड अनेक शोरूमवर झळकत होते. त्यामुळे ग्राहकांची निराशा झाली. 

होंडा, हिरो, सुझुकी यांसह अनेक दुचाकी वाहनांवर कंपन्यांनी पाच हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत सूट जाहीर केली होती. आज गाडी बुक करणाऱ्यांना सूट मिळणार असल्याने ग्राहकांनी शोरूमकडे धाव घेतली. मात्र, वितरकांकडे मोजकीच वाहने शिल्लक असल्याने अनेकांनी सकाळीच नो स्टॉकचे बोर्ड लावले होते. एक एप्रिलपासून बीएस ३ इंजीन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री व नोंदणी करता येणार नाही, असा निर्णय घेतला. देशात बीएस ३ इंजीन असलेल्या जवळपास सहा लाख दुचाकींसह आठ लाखांपेक्षा अधिक नवीन वाहने शोरूममध्ये होती. निर्णय जाहीर होताच कंपन्यांनी भरघोस सूट जाहीर केली. त्यात ग्राहकांचा लाभ झाला असला तरी वितरकांनी याबाबत चिंता व्यक्त केली. 

शहरातील सर्वच कंपन्यांच्या दुचाकी शोरूममधून गुरुवारी आणि आज सकाळपर्यंत अंदाजे दोन हजार वाहनांची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे अंदाजे आठ ते दहा कोटींची उलाढाल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात तीन परिवहन विभागाचे कार्यालय आहेत. त्यात महिन्याला दहा हजार पाचशे गाड्यांची विक्री होत असली तरी या दोनच दिवसांत दोन हजार वाहनांची नोंद झाल्याची माहिती आहे. चारचाकी वाहनांचीही विक्री झाली असून, त्याचा आकडा कळू शकला नाही.   

याबद्दल बोलताना निखिल कुसुमगर म्हणाले, आम्हाला या निर्णयाची कल्पना होती. त्यामुळे बीएस ३ इंजीन असलेल्या वाहनांची मागणीच कमी केली. काही वाहने होती, ती कंपनीकडून सूट जाहीर होताच विकली गेल्याने आम्ही सकाळीच ‘नो स्टॉक‘चा बोर्ड लावला होता.

Web Title: No stock Board has been featured on the showroom