आता भिकाऱ्यांवर पोलिसांचा "वॉच'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

शासनाकडून प्रशिक्षणाची सोय
रस्त्यावर भीक मागत फिरून आयुष्य कंठल्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्न करीत आहेत. भीक मागणाऱ्यांना पकडून सर्व सुविधायुक्‍त सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. तेथे विविध कामांचे प्रशिक्षण-कार्यशाळा घेण्यात येतात. त्यामुळे दोन पैसे कमाईसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येते.
-पंडितराव सोनवने, पोलिस निरीक्षक (सामाजिक सुरक्षा विभाग)

नागपूर - चौकातील सिग्नलवर वाहन थांबविल्यास हातात कापडे घेऊन दोन ते तीन मुले वाहन पुसतात. महिला भिकारी कडेवर मूल घेऊन पैसे मागायला लागतात. त्यामुळे वाहनचालक त्रस्त होतात. जोपर्यंत पैसे देत नाहीत तोपर्यंत ते पिच्छा सोडत नाहीत. नागरिकांना होणारा त्रास पाहता सामाजिक सुरक्षा विभागाने भिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत 66 भिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करीत सुधारगृहात डांबले आहे.

शहरातील सीताबर्डी, झाशी रानी चौक, एलआईसी चौक, रेलवे स्टेशन परिसर आणि काही धार्मिक स्थळांवर भिक्षेकरी महिलांची गर्दी दिसते. अनेक वेळा लहान मुलांनासुद्धा भिक्षा मागण्यास त्या भाग पाडतात. उघडे अंग आणि विस्कटलेले केस ठेवून अनेक मुले भीक मागताना आढळतात. तत्कालीन पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी बेगर पथकाकडून अनेक कारवाया केल्या आहेत. मात्र, महिलांवर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक पंडितराव सोनावणे यांनी दामिनी पथकावर महिला भिक्षेकऱ्यांना पकडण्याची जबाबदारी सोपवली आहे. पूर्वी, पीआर बॉंड किंवा जातमुचलक्‍यावर सोडून दिल्या जात होते. मात्र, कारवाईत सुधारणा झाल्यामुळे आता भिकारी महिलांची थेट सुधारगृहात (बेगर होम) रवानगी करण्यात येत आहे. त्यांच्यावर न्यायालयात खटला चालविल्या जाणार आहे. येथे सर्व भिक्षेकरी महिलांची शासनाच्या वतीने सुविधा पुरविण्यात येतात. आरोग्य, निवास, खान-पान आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण दिल्या जाते. जेणेकरून सुधारगृहातून सुटल्यावर भीक मागण्याऐवजी त्या कमाईला लागतील.

 

Web Title: Now beggars on the police "watch"