आता गावातच माती परीक्षण; 'मिनीलॅब'ची होणार शेतकऱ्यांना मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानाअंतर्गत खताचा समतोल वापर तसेच एकात्मिक अन्नद्रव्य वापरास चालना देण्यासाठी जमिनची आरोग्य पत्रिका तयार करण्यावर भर दिला जात आहे. माती परीक्षणासाठी शेतकऱ्यांना येणारी अडचण दूर करण्यासाठी गावपातळीवर छोट्या प्रयोगशाळा तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

मृद आरोग्य पत्रिका योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पत्रिका उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारे घटक जमिनीत आहेत अथवा नाही ही माहिती शेतकऱ्यांना मिळून उपाययोजना करता याव्यात यासाठी या कामाला प्राधान्य दिले जात आहे. राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानातील मृद आरोग्य व्यवस्थापन योजनेअंतर्गत मृद परीक्षक "मिनीलॅब'च्या माध्यमातून गावातच शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक संस्था, वैयक्तिक लाभधारकांना "मिनीलॅब' खरेदीसाठी केंद्र शासनाकडून 60 टक्के, तर राज्य शासनकडून 40 टक्के अनुदान मिळणार आहे. शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळा, कृषी चिकित्सालय, कृषी विद्यापीठामार्फत संचालित कृषी विज्ञान केंद्र यांच्यासाठी "मिनीलॅब' खरेदीसाठी 86 हजार वा जास्तीत जास्त एक लाख रुपये देले जातील.

खासगी संस्था, लाभधारकांना एकूण किमतीच्या 60 टक्के जास्तीत जास्त 45 हजार रुपये अनुदान दिले जाईल. "मिनीलॅब'ची मोका तपासणी कार्यरत झाल्यानंतर लाभार्थ्यांना डीबीटीमार्फत अनुदान वितरित केले जाईल. ही जमीन आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना मराठीतून उपलब्ध होण्यासाठी आवश्‍यक ती संगणक प्रणाली "मिनीलॅब'कडे असणे आवश्‍यक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम. बी. शेंडे यांनी सांगितले.

Web Title: Now soil testing in village