'समृद्धी महामार्गा'वर अधिकाऱ्यांची जमीन खरेदी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

नागपूर ः मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी अधिकाऱ्यांनी शेकडो हेक्‍टर जमिनी खरेदी केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. विशेष म्हणजे, या जमिनींची खरेदी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला परवानगी मिळण्यापूर्वीच झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात या जमिनी खरेदी करण्यात आल्या असून, सरकारमधील बड्या अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावावर खरेदी केल्याचे दिसून येत आहे.

नागपूर ः मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी अधिकाऱ्यांनी शेकडो हेक्‍टर जमिनी खरेदी केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. विशेष म्हणजे, या जमिनींची खरेदी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला परवानगी मिळण्यापूर्वीच झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात या जमिनी खरेदी करण्यात आल्या असून, सरकारमधील बड्या अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावावर खरेदी केल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग आणि नवनगरविरोधी शेतकरी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले असून, त्यासोबत जमिनींच्या खरेदीची कागदपत्रे आणि सातबारा उतारेही जोडले आहेत.

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग हा मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नगर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना जोडणारा आहे. या महामार्गासाठी ठाणे, नगर, अमरावती आणि नाशिक या जिल्ह्यांत "लॅंड पुलिंग' करण्यात येणार आहे. (म्हणजे, बाधित शेतकऱ्यांना जमिनींच्या बदल्यात आर्थिक मोबदल्यासोबत विकसित भूखंडही दिले जाणार आहेत.) हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी विकासाचा महामार्ग ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्याआधीच या महामार्गाच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतःसह स्वतःच्या नातेवाइकांचे उखळ पांढरे करून घेण्याचे धोरण राबवल्याचे दिसून येत आहे.

प्रस्तावित मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर स्वाभाविकपणे या महामार्गाशेजारील शेतजमिनींना अवाच्या सवा दर येणार आहे. या प्रस्तावित महामार्गावर मेगासिटीही उभ्या केल्या जाणार आहेत. याची आधीच माहिती असलेल्या आणि सध्या सत्तेच्या जवळ असलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांनी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीजवळ तब्बल आठशे एकरहून अधिक जमीन खरेदी करून ठेवली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात या जमिनींची खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे, या सर्व जमिनींची खरेदी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला आवश्‍यक मंजुरी मिळण्यापूर्वी झालेली आहे. याचाच अर्थ महामार्गाबाबतच्या निर्णयांची आधीच माहिती असलेल्या व्यक्तींनी संबंधितांना ही माहिती पुरवल्याने हे व्यवहार झाले असल्याचे आरोप होत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या व्यक्तीच्या मेहुण्याच्या नावावर सुमारे साडेतीनशे एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. तसेच, कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, ठाणे महापालिका कार्यालयातील उच्चपदस्थ, तसेच काही माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही या सोन्याच्या वाहत्या गंगेतून हात धुऊन घेतल्याचे सातबारा उताऱ्यांवरून दिसून येत आहे.

माझ्यापर्यंत आतापर्यंत तरी अशी तक्रार आलेली नाही. मात्र, जरी कोणी अशाप्रकारे जमिनी घेऊन ठेवल्या असतील, तरी त्याचा त्यांना फायदा होणार नाही. कारण, आपण "लॅंड पुलिंग'मार्फत जमिनी देत असून, शेतकऱ्यांना विकसित भूखंड देणार आहोत. तथापि, सरकारी अधिकाऱ्यांनीच जमिनी खरेदी केल्या असतील, तर त्यामागच्या पैशांचा स्रोत शोधून काढला जाईल. अशाप्रकारची कोणतीही तक्रार आलेली असल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीजवळ राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचा मुलगा पीयूष, माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांचा मुलगा रवींद्र, ठाणे जिल्हा उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांचे भाऊ विजय पवार आदी दिग्गज आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावे शेकडो हेक्‍टर जमिनीची खरेदी केली आहे. या गैरव्यवहारांची चौकशी करा, अशी मागणी समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
- बबन हरणे, समन्वयक, शेतकरी संघर्ष समिती

- ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात या जमिनींची खरेदी
- महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीजवळ तब्बल आठशे एकरहून अधिक जमीन खरेदी
- सर्व जमिनींची खरेदी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला आवश्‍यक मंजुरी मिळण्यापूर्वी

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

04.06 PM

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

04.06 PM

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

04.06 PM