व्यापाऱ्यांनी पाडले संत्र्याचे भाव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

अमरावती - संत्र्याला चांगले भाव मिळण्याचे संकेत असतानाच अचानक पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने त्याचा लाभ व्यापाऱ्यांनी घेतला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. आता तोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकऱ्यांत व्यक्त करण्यात येत आहे. 

अमरावती - संत्र्याला चांगले भाव मिळण्याचे संकेत असतानाच अचानक पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने त्याचा लाभ व्यापाऱ्यांनी घेतला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. आता तोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकऱ्यांत व्यक्त करण्यात येत आहे. 

जिल्ह्याच्या मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूरबाजार या भागात सर्वाधिक संत्र्याचे उत्पादन होते. 7 नोव्हेंबर रोजी दरहजारी संत्र्याला 6,200 रुपये भाव होता. आज हा भाव सात हजार रुपयांवर पोहोचला असता, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. परंतु, अचानक पाचशे व हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद झाल्याने या संधीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी संत्र्याचे भाव पाडण्यास सुरुवात केली. काही व्यापाऱ्यांनी चेकने व्यवहार करण्याचे मान्य केले; परंतु त्यावर शेतकऱ्यांचा विश्‍वास नाही. कारण संबंधित व्यापारी परप्रांतीय आहेत. 

विशेष म्हणजे, जीवनावश्‍यक वस्तू घेण्यासाठीसुद्धा नागरिकांकडे रोख नसल्याने ते संत्र्याकडे का वळतील, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. त्यातूनच दिल्लीची मंडईसुद्धा बंद झाली. त्यामुळेच व्यापाऱ्यांना माल उचलण्याची चिंता आहे. शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने 16 ते 18 रुपये किलो या दराने व्यापारी संत्रा घेण्याची तयारी दाखवीत आहेत. वास्तविक पाहता सध्या संत्र्याला 36 ते 38 रुपये किलो भाव आहे. 

पुण्या-मुंबईतही मागणी नाही 

आमच्याकडील संत्रा आम्ही मुंबई तसेच पुण्याला पाठवितो. संत्रा उत्पादक कंपनीच्या माध्यमाने या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेत; परंतु ग्राहकांकडे नव्या नोटाच नसल्याने तेथेही संत्रा तसाच पडून आहे, असे हिवरखेड येथील संत्रा उत्पादक शेतकरी देवेंद्र गोरले यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक 

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अतिशय नाजूक झालेली आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेत. डिसेंबरमध्ये पुढील हंगामाची तयारी शेतात करण्यात येते; परंतु सध्यातरी तशी स्थिती दिसत नसल्याने पुढच्या हंगामावर परिणाम होणार. येत्या 15 दिवसांत या मुद्द्यावर निकाल लागला नाही, तर आमचे प्रचंड नुकसान होईल, असे संत्रा उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम भेले यांनी सांगितले.