डॉक्‍टरांनी फुलविला भावी डॉक्‍टरचा चेहरा 

डॉक्‍टरांनी फुलविला भावी डॉक्‍टरचा चेहरा 

नागपूर - जन्मापासूनच जबडा समोर आलेला. वय वाढत होते, तसे समोर आलेला जबडा बघून मनात न्यूनंगड निर्माण होत होता. एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला असताना डेंटल कॉलेजमध्ये उपचार होत असल्याचे कळले. मनात भीती घेऊनच उपचारासाठी आले. येथे सर्व दंतचिकित्सकांनी चर्चेतून "आर्थोग्नॅथिक सर्जरी' केली. दहा महिने पूर्ण झाले. आता मनातील न्यूनगंड पूर्णपणे नाहीसा झाला. आयुष्यभराचे जगणे सुकर झाले. दंतच्या डॉक्‍टरांनी माझा चेहरा फुलवला, अशी भावना मेडिकलमधील भावी डॉक्‍टर असलेली रेवती पिल्ले यांनी व्यक्‍त केली. 

"आर्थोग्नॅथिक सर्जरी'पासून, तर कॉस्मेटिक सर्जरी करून चेहऱ्यावरील व्यंग काढून टाकण्यात येते. परंतु, गरिबांच्या आवाक्‍यात ही शस्त्रक्रिया नाही. खासगीत तब्बल तीन ते चार लाख रुपये शस्त्रक्रियेसाठी मोजावे लागतात. गरिबांसाठी शासकीय दंत महाविद्यालयात "आर्थोग्नॅथिक सर्जरी' वरदान ठरत असल्याचे अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी सांगितले. 

मानवी चेहऱ्याची ठेवण नाक, डोळे, हनुवटी आणि कपाळ यांच्या व्यवस्थित ठेवणीवर अवलंबून असते. परंतु, अनेकांच्या चेहऱ्याची ठेवणीच नाक बसके असते, तर जबडा समोर आलेला असतो. अनेकांचे ओठ लहान असतात. तसेच चेहऱ्यावरील ही विसंगती शस्त्रक्रियेतून सहज दूर करता येते. शासकीय दंत महाविद्यालयात शैक्षणिक तसेच उपचारात प्रगती होत असल्याचे डॉ. गणवीर म्हणाल्या. जबडा समोर किंवा मागे असला की, चेहऱ्याची ठेवण बिघडते. यावर "आर्थोग्नॅथिक सर्जरी' केवळ 2,200 रुपयांत शासकीय दंत महाविद्यालयात होत असल्याची माहिती डॉ. गणवीर यांनी शनिवारी दिली. पत्रकार परिषदेला डॉ. संजय चव्हाण उपस्थित होते. 

शंभरपैकी चार जणांना दोष 
जन्माला येणाऱ्या 100 बाळांपैकी चार बाळांच्या जबड्यांमध्ये दोष आढळतो. जबड्यांचा आकार गरजेपेक्षा मोठा किंवा लहान असला तरी दातांची रचना मात्र तेवढीच राहते. आधुनिक उपचार पद्धतीमुळे हे दोष दूर करता येणे शक्‍य झाले आहे. दंतोव्यंगोपचारशास्त्र, मुख शल्यचिकित्साशास्त्र यांच्या समन्वयातून जबड्याला चेहऱ्याच्या ठेवणीतील आकार देता येतो. किमान दोन वर्षे उपचार करावे लागत असल्याचे दंत व्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. वसुंधरा भड म्हणाल्या. 


रेवतीच्या जबड्यावर "आर्थोग्नॅथिक सर्जरी' वरदान ठरली. विद्रुप दिसत असलेला चेहऱ्याची ठेवण सामान्य करण्यात नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला यश आले. तीन वर्षांपासून ही सर्जरी येथे होत असून, आतापर्यंत 112 युवा-युवतींचे चेहऱ्यांवर हास्य फुलविले आहे. 
-डॉ. अभय दातारकर,  मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख. 


तीन वर्षातील "आर्थोग्नॅथिक सर्जरी' 
2015-16 - 22 शस्त्रक्रिया 
2016-17 - 36 शस्त्रक्रिया 
2017-18 - 47 शस्त्रक्रिया 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com