पक्षकाराचा जिल्हा न्यायालयात मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नागपूर - हृदयविकाराच्या झटक्‍याने पक्षकाराचा जिल्हा न्यायालयातील आठव्या माळ्यावर मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 13) दुपारी दीड ते दोन वाजतादरम्यान घडली. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून सुरू असलेल्या कोर्टकचेरीचा ताणतणाव सहन न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. 

संतुमल पमनदास मेटवानी (वय 75, रा. जरीपटका) असे मृताचे नाव आहे. जरीपटका येथील चांदुराम मंदिराच्या बाजूला मेटवानी परिवाराचे साडेचार हजार वर्गफूट जागेवर वडिलोपार्जित घर आहे. संतुमल यांना गोवर्धन, डॉ. अमर, भोलानाथ, हरीशकुमार आणि राम असे पाच भाऊ आणि कांचन पंजवानी आणि रोशनी लालवानी या दोन बहिणी आहेत. जरीपटक्‍यातील जागेचे सर्व भावांमध्ये समान वाटप व्हावे, यासाठी डॉ. अमर मेटवानी यांनी दोन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. याच प्रकरणी शुक्रवारी न्यायाधीश तोतला यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. गेल्या काही महिन्यांपासून संतुमल यांचे इतर नातेवाईक सुनावणीला हजर राहत नव्हते. यामुळे संतुमल यांनी याचिका रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. यानुसार आज याचिका रद्द होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. संतुमल सुनावणीसाठी आले असता आठ मजले पायऱ्या चढून गेले. वृद्धापकाळामुळे त्यांना थकवा जाणवला. त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार भाऊ राम यांच्याकडे केली. भावाने त्यांना खुर्चीत बसविले. बराच वेळ हालचाल होत नसल्याने शंका निर्माण झाली. 

पोलिसांच्या मदतीने त्यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राप्त सूचनेवरून सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.