लोकसहभागाचा ‘रोप वे’

ropeway
ropeway

गोंदिया जिल्ह्यातील ‘हाजरा फॉल’कडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मध्य भारतातील सर्वांत मोठ्या ‘रोप-वे’मुळे एका पहाडावरून दुसऱ्या पहाडावर पर्यटकांना सहजगत्या जाता येते. हा प्रवास फक्त तीन मिनिटांचा असला तरीही पर्यटकांचा ओढा वाढला असताना स्थानिकांना रोजगार मिळाला असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे.  

महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्‍यातील नवाटोला येथे ‘हाजरा फॉल’ आहे. पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र. दरेकसा या छोट्या रेल्वे स्थानकापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरील हे स्थान जंगलाने वेढलेले आहे. पहाडावरून कोसळणारे पाणी आणि दोन वर्षांपासून सुरू असलेल्या साहसी खेळाने येथे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जुलै ते डिसेंबर हा धबधबा प्रवाही असतो. इंग्रज अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून विकसित केले. 

काहीसे दुर्लक्षित असलेल्या या स्थानाच्या विकासासाठी उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी साहसी उपक्रम राबविणारे अविनाश देऊस्कर यांच्याशी चर्चा केली. स्थानिकांच्या रोजगारासाठी हे ठिकाण उत्तम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर देऊस्कर यांनी नवाटोला येथील नागरिकांची एक बैठक घेतली. त्यात शासनावर अवलंबून न राहता गावानेच पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून याबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी गावातील नागरिकांनी हाजरा परिसराचे  सौंदर्यीकरण केले. नागरिकांनी पुढाकार घेतल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांकडून संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटनातून गावकऱ्यांना अधिकाधिक रोजगार मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने साहसी उपक्रमासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यातून येथे देशातील सर्वांत मोठी ‘झिप लाइन’ लावण्यात आली. सोबतच इतरही साहसी खेळांची सोय आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली. 

गेल्या दीड वर्षात एक लाखावर पर्यटकांनी ‘हाजरा फॉल’ला भेट दिली असून, गावकऱ्यांना बारा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गावातील ५० पेक्षा अधिक युवकांना रोजगार मिळाला. शिवाय आसपासच्या गावातील युवकांनाही येथे रोजगार मिळू लागला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. आगवण आणि वनरक्षक सुरेश रहांगडाले यांच्या सहकार्याच्या भूमिकेचा गावकऱ्यांना फायदा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com