पीयुष कुमार यांचे 'नागपूर वापसी'साठी प्रयत्न

नितीन नायगावकर
मंगळवार, 16 मे 2017

नागपूर - दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालकपद आणखी तीन वर्षे आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी डॉ. पीयूष कुमार यांनी "राजकीय' आधार घेण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज केल्याचे सूत्रांकडून कळते. "नागपूर वापसी'साठी त्यांचे प्रयत्न सुरू झाल्यामुळे केंद्रातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

नागपूर - दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालकपद आणखी तीन वर्षे आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी डॉ. पीयूष कुमार यांनी "राजकीय' आधार घेण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज केल्याचे सूत्रांकडून कळते. "नागपूर वापसी'साठी त्यांचे प्रयत्न सुरू झाल्यामुळे केंद्रातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

गैरव्यवहाराच्या कचाट्यात अडकलेल्या दक्षिण मध्य केंद्राला सांस्कृतिक वळणावर आणण्याचे काम रवींद्र सिंगल आणि डॉ. पीयूष कुमार या दोन संचालकांनी केले. सोयीनुसार त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या बाजूने बोलणारा कर्मचारी व अधिकारीवर्ग त्या त्या वेळी तयार होत गेला. पीयूष कुमार यांनी जास्तीत जास्त कार्यक्रम घेऊन केंद्राला पूर्णवेळ व्यस्त ठेवण्याचे काम केले. त्यामुळे अनेक लोक त्रस्त होते. तर ज्यांनी पीयूष कुमार यांना त्रस्त करून सोडले त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्याचाही पीयूष कुमार यांनी प्रयत्न केला, असे कळते. कार्यकाळ संपल्यावर पीयूष कुमार आपल्या गावी परतले आणि केंद्र "जैसे थे' झाले. काही दिवसांनी संचालकपदासाठी जाहिराती निघाल्या. राज्यपाल कार्यालयात देशभरातून अर्ज आले. ठरलेल्या मुदतीत एकूण 48 अर्ज देशभरातून आल्याची माहिती आहे.

संचालकपदासाठी अर्ज करणाऱ्यांची नावे माहिती करून घेणे, हे बाहेरच्यांसाठी अत्यंत जिकरीचे काम आहे. मात्र, केंद्रातील "अनुभवी' कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी ते फार सोपे आहे. डॉ. पीयूष कुमार यांनी पुन्हा अर्ज केल्याची माहिती केंद्रात येऊन धडकली आणि अनेकांचे धाबे दणाणले. अवघ्या पंधरा दिवसांत विविध कारणांनी माध्यमांमध्ये केंद्र चर्चेत आले. केवळ चर्चेत आले नाही, तर पीयूष कुमार यांची एंट्री रोखण्यासाठी थेट प्रयत्न झाल्याचेही स्पष्ट झाले. एकाच व्यक्तीने दोनवेळा प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून केंद्राचे संचालकपद भूषविण्याची घटना आजपर्यंत घडलेली नाही. मात्र, पीयुष कुमार यांचे फासे योग्य पडले, तर विशिष्ट्य लोकांसाठी ते अडचणीचे ठरू शकतात, असे म्हणायला हरकत नाही.

नागपुरातूनही अर्ज
संचालकपदी सांस्कृतिक क्षेत्रात कामाचा अनुभव असलेली व्यक्ती असावी, असा नियम चार वर्षांपूर्वी करण्यात आला. पण, प्रशासकीय कामाच्या अनुभवाची अटही टाकण्यात आली. त्याच आधारावर पीयुष कुमार संचालक झाले. यंदा याच नियमाचा आधार घेऊन नागपूरच्याही सांस्कृतिक क्षेत्रातील दहा ते बारा मंडळींनी संचालकपदासाठी अर्ज केल्याचे सूत्रांकडून कळते.