"त्या' मुलांच्या पाल्यांचा शोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नागपूर - जिल्हा महिला व बालकल्याण व पोलिस विभागाने कारवाई करीत लहान मुलांकडून रस्त्यावर भीक मागायला लावणाऱ्या तीन महिलांना अटक करून त्यांच्याकडून आठ चिमुकल्यांची सुटका केली. गुरुवारी या सर्व मुला-मुलींना महिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीसमोर पालक म्हणून कुणीही हजर झाले नाही. ही मुलं कुठली आहेत, त्यांचे पालक कोण, याचा शोध पोलिस घेत आहेत. 

लहान मुलांकडून जबरदस्ती काही लोक भीक मागवून घेतात. रणरणत्या उन्हात लोकांकडून त्यांना भीक मागण्यास सांगण्यात येते. हा प्रकार शहरात अनेक चौकांत सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांनी जिल्हा संरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण यांच्या नेतृत्वातील पथकामार्फत व्हेरायटी चौक, झासी राणी चौक ते पंचशील टॉकीज दरम्यान भीक मागणाऱ्या आठ मुलांना ताब्यात घेतले. यात सात मुली व एका मुलाचा समावेश आहे. ही सर्व मुले 4 ते 11 वर्षे वयोगटातील आहेत. तसेच मुलांकडून भीक मागवून घेणाऱ्या तीन महिलांनाही अटक केली होती. यात अरुणा भोसले, निशा माली व रेणुका पवार सर्व राहणार यशवंत स्टेडियम यांचा समावेश आहे. गुरुवारी या सर्व आठही मुलामुलींना जिल्हा महिला बाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यांचे पालक म्हणून कुणीही समोर आले नाही. या मुलांना भीक मागविण्यास लावणारी टोळी सक्रिय असून यांना बाहेरून आणण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता ही मुले कुठली आहेत, यांचे पालक कोण, याचा तपास पोलिस विभाग करीत असल्याची माहिती आहे. 

कारवाई निरंतर सुरू राहावी 
मुलांकडून भीक मागविणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहरात अनेक चौकात अशा प्रकारे लहान मुले भीक मागताना दिसतात. यातील काही मुलांना बाहेर राज्यातून चोरी करून भीक मागविण्याच्या व्यवसायात लावण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असल्याने अशी कारवाई सतत सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: police arrested women