पोलिस आयुक्‍तांचे प्रोजेक्‍ट "सी-3'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

थेट तक्रार नोंदवा सायबर क्राइम कम्प्लेंट सेलमध्ये

थेट तक्रार नोंदवा सायबर क्राइम कम्प्लेंट सेलमध्ये
नागपूर - उपराजधानीला "क्राइम कॅपिटल' अशी ओळख होती. मात्र, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम नवनवीन प्रोजेक्‍ट हाती घेतले आहेत. पोलिस विभागाला अपडेट करण्यासह डिजिटलायजेशनवर त्यांनी भर दिला आहे. पोलिस आयुक्‍तांचा नवा प्रोजेक्‍ट "सी-3' साकारत आहे. येत्या आठवडाभरात सी-3 म्हणजेच "सायबर क्राइम कम्प्लेंट सेल' कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईल हरविल्यापासून ते बॅंकेतून ऑनलाइन पैसे काढण्यापर्यंतच्या सर्वच तक्रारी आता "सी-3' या प्रोजेक्‍टमध्ये स्वीकारण्यात येणार आहेत. स्मार्ट पोलिसिंगच्या या महत्त्वाकांक्षी पावलामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या ऑनलाइन फसवणुकींच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डचा पासवर्ड विचारून पैसे काढण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अशा तक्रारी पूर्वी स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदविण्यात येत होत्या. ठाण्यात दाखल झाल्यानंतर तपासात सायबर क्राइमची मदत घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे पोलिस अधिकारी आणि पीडितांनाही त्रास सहन करण्यासह वेळ वाया जातो. मात्र, त्यावर तोडगा म्हणून पोलिस आयुक्‍तांनी थेट तक्रार नोंदविण्यासाठी सायबर क्राइम कम्प्लेंट सेल' तयार केला. आर्थिक गुन्हे शाखेच्या इमारतीत पोलिस ठाण्याचा दर्जा असलेले सी-3 विभाग तयार केला आहे. येथे थेट तक्रारदार "एफआयआर' दाखल करू शकतो.

पोलिस ठाण्याचा असेल दर्जा
आतापर्यंत सायबर क्राइमला केवळ सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात आला होता. मात्र, सायबर क्राइम कम्प्लेंट सेलला पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात येणार आहे. यासोबतच पाच टेक्‍निकल एक्‍स्पर्ट, चार एपीआय, चार पीएसआय आणि ठाण्याप्रमाणे कर्मचारी असतील. येथे आयटी ऍक्‍टनुसार जे गुन्हे असतील ते दाखल करण्यात येणार आहेत.

सुसज्ज लॅब तयार
सायबर क्राइम कम्प्लेट सेलसाठी नव्याने विभाग निर्माण करण्यात आला असून सुसज्ज अशी वातानुकूलित लॅब तयार करण्यात आली आहे. येथे कॉम्प्युटर्स, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आणि अन्य ऍडव्हान्स टेक्‍नॉलॉजी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी काही पुरावे पुण्याला पाठविण्यात येत होते, ते सर्व काम नागपुरातून होणार आहे.