प्रचार थांबला; आता गाठीभेटीवर भर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

नितीन गडकरी यांनी विकासावर उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोंडसुख घेत सभांमध्ये रंगत आणली.

नागपूर : महापालिकेतील सत्तेसाठी गेल्या 12 दिवसांपासून राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवारांनी भोंगे वाजवित, नेत्यांच्या सभा घेत मतदार राजावर भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. गेल्या बारा दिवसांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. उमेदवारांच्या प्रचारावर आज सायंकाळी साडेपाच वाजता निर्बंध आले. मात्र, उद्या मतदारांशी गाठीभेटी करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिल्याने उमेदवारांना सवड मिळण्याची चिन्हे नाहीत.

महापालिकेच्या 38 प्रभागांतील 151 जागांसाठी मंगळवारी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या 48 तासांपूर्वी प्रचार बंद करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश असल्याने आज सायंकाळी साडेपाच वाजता राजकीय पक्षांचा प्रचार संपुष्टात आला. त्यामुळे मागील आठवड्यापासून वस्ती, मोहल्ल्यांमध्ये होणारी नेत्यांची भाषणे आज बंद झाली. महापालिका निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसचे प्रत्येकी दीडशे उमेदवार असून शिवसेनेने 85 उमेदवार रिंगणात उभे केले आहे. राष्ट्रवादीने 95 तर बसपने 103 उमेदवार उभे केले. मनसेतर्फे 31 उमेदवार इंजिनवर स्वार झाले होते. केंद्रीय जनसुराज्य पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी या लहान पक्षांसह अपक्ष एकूण 1,135 उमेदवार रिंगणात असून त्यांनी गेल्या बारा दिवसांत प्रचार केला.

आठवडभरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी जवळपास दहा ते पंधरा सभा घेतल्या. त्यातुलनेत कॉंग्रेसकडून मोठ्या नेत्यांच्या सभा म्हटल्यास केवळ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याच सभेची आठवण नागपूरकरांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. नितेश राणे यांनी एक सभा घेतली तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सभेतून भाजपवर तोंडसुख घेतले. नितीन गडकरी यांनी विकासावर उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोंडसुख घेत सभांमध्ये रंगत आणली. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली. कॉंग्रेस, बसपच्या अनेक सभांना नेतेच आले नाहीत. गेली बारा दिवस भोंगे, उमेदवारांचे प्रचारगीतांनी प्रत्येक वस्ती "प्रचार कल्लोळ' दिसून आला. आज सायंकाळी या भोंग्यांवर, प्रचारगीतांवर बंधने आली.