पॉलीचे ‘हब ॲण्ड स्पोक’ मॉडेल अभियांत्रिकीत - डॉ. अभय वाघ

मंगेश गोमासे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नागपूर - राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचा नामवंत उद्योग समूहांसोबत संवाद साधण्यासाठी ‘पॉलिटेक्‍निक’ अभ्यासक्रमात राबविण्यात आलेले ‘हब ॲण्ड स्पोक’ मॉडेल आता अभियांत्रिकीमध्येही राबविणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी ‘सकाळ’ला उपरोक्त माहिती दिली. 

नागपूर - राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचा नामवंत उद्योग समूहांसोबत संवाद साधण्यासाठी ‘पॉलिटेक्‍निक’ अभ्यासक्रमात राबविण्यात आलेले ‘हब ॲण्ड स्पोक’ मॉडेल आता अभियांत्रिकीमध्येही राबविणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी ‘सकाळ’ला उपरोक्त माहिती दिली. 

पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरही नोकरी मिळत नाही. मोजक्‍या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळते. ते करतानाही बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा कंपन्यांना आवश्‍यक असलेल्या स्किल विद्यार्थ्यांमध्ये नसल्याचे दिसून येते. यामध्ये नेमके कंपन्यांना काय हवे आहे, हे कळत नाही. यामुळे अभियांत्रिकीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागते. यातूनच देशभरात कौशल्यविकास अभ्यासक्रमांची जोड अभ्यासक्रमांना देण्याचे ठरविण्यात आले. केंद्र सरकारने त्यासाठी ‘स्कील इंडिया’ उपक्रमास सुरुवात केली. या अभियानाचा आधार घेत, उद्योग समूह आणि महाविद्यालयांमधील दरी कमी करण्यासाठी पॉलिटेक्‍निकमध्ये दोन वर्षांपूर्वी ‘हब ॲण्ड स्पोक’ उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमातून उद्योग समूहांशी करार करून उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला. यासाठी विविध नामांकित उद्योग समूहांशी शासनाद्वारे करार करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे. महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षित करून कंपन्यांना नेमक्‍या कोणत्या कौशल्याची गरज आहे, यासंदर्भात माहिती देण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य प्लेसमेंटही मिळेल.

एल ॲण्ड टी, महिंद्राशी करार 
‘हब ॲण्ड स्पोक’ मॉडेल राबविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला कंपन्यांशी करार करायचा आहे. यापूर्वीच विभागाद्वारे एल ॲण्ड टी कंपनीशी करार केला आहे. नागपुरासह विदर्भातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी महिंद्रा आणि इतर कंपन्यांसोबत करार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अभय वाघ यांनी दिली. 

विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळावे यासाठी पॉलिटेक्‍निकमध्ये यशस्वी झालेले मॉडेल अभियांत्रिकी लावण्यात येणार आहे. त्यातून अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्रशिक्षणाची संधी मिळेल. 
- डॉ. अभय वाघ, संचालक,  उच्च व तंत्रशिक्षण विभाग.

Web Title: polytechnic hub and spoke model engineering dr. abhay wagh