आमचे जगणे होते प्रतीक्षा यादीत

आमचे जगणे होते प्रतीक्षा यादीत

नागपूर - आमचे यकृत निकामी झाले होते. जगण्यासाठी यकृताचे दान मिळेल या आशेवर जगत होतो. आमचे जगणे प्रतीक्षा यादीत होते. नशीब बलवत्तर म्हणूनच जिवंतपणी मरणयातना भोगताना यकृताचे दान पदरात पडले व नवीन श्‍वास मिळाला. ज्यांनी आम्हाला जीवनदान दिले त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आम्हीदेखील दुसऱ्याला अवयवदान करू, अशा भावना यकृताचे दान स्वीकारून नवे आयुष्य सुरू करणाऱ्या नवी दिल्ली येथील प्रिती खन्ना, ओमप्रकाश सिंग व नागपूर येथील चंद्रशेखर मौंदेकर यांच्या आहेत.

लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये महिनाभरापूर्वी एकापाठोपाठ तीन ‘यकृत प्रत्यारोपण’ करीत नागपूरच्या अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात नवा अध्याय लिहिला. नव्हेतर अवदानाच्या चळवळीला गती दिली. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना भावनांना वाट मोकळी करून देत असताना तिघांनीही डॉक्‍टर आमच्यासाठी देवदूत ठरल्याचे सांगितले. आम्हाला नवीन आयुष्य देणाऱ्या चारही डॉक्‍टरांचे आभार मानणार नाही, तर त्यांच्या समोर नतमस्तक होणार असल्याची हृदयस्पर्शी भावना प्रिती खन्ना यांनी बोलून दाखवली. दोन वर्षांपूर्वी यकृत निकामी झाले. नवी दिल्लीतील वेदांता रुग्णालयात यकृतासाठी नोंद केली. परंतु, वेटिंग लिस्ट मोठी होती. अखेर नागपुरात यकृत दानातून नवीन श्‍वास मिळाला. या शहरासोबत आता नाते जुळले आहे, असे खन्ना म्हणाल्या. 

अवयवदान करणार
नजरेसमोर मृत्यू दिसत होता. नवी दिल्ली, बंगळुरू व चेन्नइतही नाव नोंदवले. प्रतीक्षा यादीवर आयुष्य अवलंबून होते. अखेर न्यू इरामुळे नवा जन्म मिळाला. आयुष्याच्या अखेरीस अवयवदान करण्याचा संकल्प कोलकाता येथील ओमप्रकाश सिंग यांनी बोलून दाखवला. हीच भावना नागपूर येथील चंद्रशेखर मौंदेकर यांनी व्यक्त केली. यकृताच्या वेदना सहन होत नव्हत्या. आयुष्य नकोसे झाले होते. मृत्यू जवळजवळ येत होता. अशावेळी यकृताचे दान येथे मिळाले. डॉ. अजय संचेती यांच्या रुग्णालयात अवयवदान करणार असे मौंदेकर म्हणाले. 

समाजात व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लिव्हर सिरॉयसीसचा टक्काही वाढत आहे. या खेरीज वारंवार होणाऱ्या काविळीमुळेही यकृतावर परिणाम होतो. ऑटो इम्यून डिसीजमध्ये आपल्याच शरीरातील पेशी अवयवांना निकामी करू लागतात.
- डॉ. राहुल सक्‍सेना, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ, न्यू इरा हॉस्पिटल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com