खड्ड्यांचा मनस्ताप आणखी दोन वर्षे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नागपूर - जेट पॅचरने खड्डे बुजविण्याबाबत अनेकदा शंका उपस्थित केली जात असली तरी पालिकेने या मशीनवर आणखी एकदा विश्‍वास दाखविला. या मशीनने खड्डे बुजविण्यास कंत्राटदाराला दोन वर्षे मुदतवाढीचा प्रस्ताव हॉट मिक्‍स प्लांट विभागाने तयार केला. यानिमित्त पालिकेने पुढील दोन वर्षे नागपूरकरांना खड्ड्यांचा मनस्ताप सहन करावा लागण्याचे संकेतच दिले. 

जेट पॅचरने खड्डे बुजविण्याचे काम समाधानकारक असल्याचीच पावती हॉट मिक्‍स प्लांटने मुदतवाढीचा प्रस्ताव तयार करून दिली. मागील पावसाळ्यात व त्यानंतरही शहर खड्ड्यात गेले असले तरी हॉट मिक्‍स प्लांट विभागाने जेट पॅचरने खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी अनेकदा सभागृहात जेट पॅचर मशीनने खड्डे बुजविण्यात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बघून जेट पॅचरचे नेमके काम काय? असाही प्रश्‍न उपस्थित केला जातो. हे सर्व प्रश्‍न, आरोपांना तिलांजली देत बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत जेट पॅचरला दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. या कामासाठी 7 कोटी 61 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्याचे प्रस्तावात नमूद आहे. 

कमी खर्चात काम करण्यास कंत्राटदार तयार 
जेट पॅचरने खड्डे दुरुस्तीसाठी यापूर्वी 1040 रुपये प्रतिचौरस मीटर हा दर होता. आता कंत्राटदार कंपनीने 1015 रुपये प्रतिचौरस मीटर दराने काम करण्यास तयारी दर्शविली. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू, बांधकामाचे दर वाढत असताना कंत्राटदार कंपनी कमी दरात काम करण्यास तयार झाल्यानेही जेट पॅचरने खड्डे बुजविण्याच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.