रेल्वेस्थानकांवर ऊर्जानिर्मिती केंद्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

२१ ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प : मरेने धरली शाश्‍वत ऊर्जेची कास
नागपूर - मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने शाश्‍वत ऊर्जेची कास धरली आहे. त्यातूनच विभागातील तब्बल २१ रेल्वेस्थानकांवर रूफ टॉप सोलर प्रकल्प साकारून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागस्तरावर निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे.

२१ ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प : मरेने धरली शाश्‍वत ऊर्जेची कास
नागपूर - मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने शाश्‍वत ऊर्जेची कास धरली आहे. त्यातूनच विभागातील तब्बल २१ रेल्वेस्थानकांवर रूफ टॉप सोलर प्रकल्प साकारून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागस्तरावर निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे.

नैसर्गिक स्रोतांद्वारे पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीवर शासनाचा भर आहे. त्यातूनच रूफटॉप सोलर योजनेला चालना दिली जात आहे. रेल्वेनेसुद्धा शाश्‍वत ऊर्जेची कास धरली असून, मध्य भारतात सौरऊर्जा निर्मितीला सर्वाधिक संधी आहे. नागपूर, अजनी, चंद्रपूर, वर्धा, बैतूलसह विभागातील २१ रेल्वेस्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमधून २ हजार ८५३ किलोवॉट ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सर्वाधिक ५८० किलोवॉटचा प्रकल्प साकारला जाणार आहे. फलाटावरील छतावर सोलर पॅनेल लावून निर्माण होणारी ऊर्जा फलाटाला प्रकाशित करण्यासाठी होऊ शकेल. दिवसा लाइट बंद असताना पंखेही चालू शकतील. हिवाळ्यात लाइट आणि पंखे दोन्ही बंद असतात. अशा वेळी निर्माण होणारी ऊर्जा ग्रीडमध्ये सोडण्यात येईल. यामुळे रेल्वेचा वीज वापरावरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकेल. 

अजनीतील ग्राउंड लेवल पंप हाउस येथे २७५ किलोवॉट तर अजनी स्थानकावर ६५ किलोवॉटचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. यासाठी प्रस्तावित एकूण खर्च आणखी कमी करण्यासाठी एकत्र निविदा काढण्यात आल्या. सप्टेंबर महिन्यात निविदा काढण्यासाठी हा प्रकल्प हेडक्वॉर्टरला पाठविण्यात आला. आता निविदा प्रक्रियाही सुरू झाली. सद्य:स्थितीत शहरातील डीआरएम कार्यालयाच्या इमारतीवर केवळ १० किलोवॉटचा प्रकल्प साकारण्यात आला. यामुळे इमारतीतील लाइट दिवसभर सुरू ठेवूनही वीजबिलावरील खर्चात मोठी घट नोंदविली जात आहे.

काळाची गरज म्हणून मध्य रेल्वेकडून पर्यावरणपूरक सौरऊर्जेवर भर दिला आहे. रेल्वेस्थानकांवर सौरऊर्जा निर्मितीची आसलेली संधी लक्षात घेऊन नागपूर विभागाने विस्तृत प्रकल्प तयार केला. प्रकल्पासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये स्पर्धा होऊन कमीत कमी खर्चात प्रकल्प साकारला जावा यासाठी विभागस्तरावर एकत्र निविदा काढण्यात आली. निविदा प्रक्रियेनंतर तातडीने कामाला प्रारंभ होईल.
- बृजेश कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर