अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक

अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक

नागपूर - अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उद्या, मंगळवारी निवडणूक होत आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय समीकरणे सुरूच होती. या तिन्ही जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी कोण-कोण एकत्र येणार हे उद्या, मंगळवारी निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. 

अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. ५९ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक २६ तसेच आरपीआयचा एक असे २७ सदस्य असून शिवसेनेने रविवारी (ता. १९) काँग्रेसशी घरोबा  केला. त्यामुळे या आघाडीचा बहुमताचा आकडा ३० पर्यंत गेला आहे. सोबतच राष्ट्रवादी व दोन अपक्षसुद्धा आघाडीसोबत राहण्याची चिन्हे आहेत. 

यवतमाळ जिल्हा परिषदेत एकाही पक्षाजवळ बहुमत नसल्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शक्ती पणाला लावली होती. त्यातून कधी सेना-राष्ट्रवादी, तर कधी काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप अशा समीकरणांवर राजकीय वर्तुळात चर्चा होती. वर्धा जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील नितीन मडावी यांचे नाव जवळपास निश्‍चित मानले जात आहे, तर उपाध्यक्षपदासाठी देवळी विधानसभा मतदारसंघातील मुकेश भिसे यांच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. आर्वी विधानसभा क्षेत्राला दोन सभापतिपद तर देवळी व वर्धा विधानसभा क्षेत्राला प्रत्येकी एक सभापतिपद देण्यात येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन्ही पदांकरिता गेल्या आठवड्यापासून इच्छुक उमेदवार भाजप नेत्यांची मनधरणी करीत असल्याचे दिसून आले. चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. घोसरी-चिंतलधाबा क्षेत्रातून निवडून आलेले देवराव भोंगळे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्‍यता आहे तर उपाध्यक्षपदासाठी संजय गजपुरे यांच्या नावाची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे ३३ सदस्य निवडून आले. तीन अपक्ष उमेदवारही भाजपच्या गोटात असल्याने त्यांचे संख्याबळ ३६ आहे. काँग्रेसचे २० उमेदवार निवडून आले.

 गडचिरोलीत चित्र अस्पष्ट 
बहुमत सिद्ध करण्याची वेळ एक दिवसावर येऊन ठेपली असतानाही गडचिरोली जिल्हा  परिषदेतील सत्ता स्थापनेच्या समीकरणाचे चित्र स्पष्ट झाले नाही. मात्र, सत्तेच्या या सारिपाटात भाजप वरचढ दिसून येत आहे. ५१ जागांसाठी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सर्वाधिक २०,  काँग्रेसला १५, आदिवासी विद्यार्थी संघाला ७, राष्ट्रवादी काँग्रेसला ५, ग्रामसभांना २, तर अपक्षांना २ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी भाजपला मदत करण्याचा  निर्णय घेतला. या दोन्ही पक्षांचे मिळून २५ सदस्य होतात. त्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या वर्षा कौशिक यांना सोबत घेतले तर सत्तेचे गणित जुळू शकते. दुसरीकडे भाजप आणि आविसंची युती झाल्यास २७ सदस्य होतात. मात्र, या युतीला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा विरोध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com