पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या घरावर देणार धडक - बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

अमरावती - शासनाने शेतकऱ्यांचा आवाज न ऐकल्यास, त्यांना जागे करण्यासाठी हनुमान जयंती, महात्मा जोतिबा फुले जयंती व छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून ११ एप्रिलपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुक्रमे नागपूर व वडगाव (गुजरात) येथील घरासमोर धडक दिली जाईल. हजारो दुचाकीस्वार या चार हजार किलोमीटरच्या प्रवासात सहभागी होतील, अशी घोषणा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी आज येथे केली. 

आमदार कडू यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी (ता. ५) नांगर आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. त्याचा निषेध व चौकशी तसेच दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी आमदार कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते; त्याची सांगता शुक्रवारी रक्तदानाने झाली. आमदार कडू यांनी संघटनेची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर विशद केली.

सरकारने दिलासा न दिल्यास प्रहार संघटना शेतकऱ्यांना आधार देईल. शहरात अवैध धंदे फोफावलेले आहेत. पोलिस त्यांच्याविरुद्ध कारवाई करीत नाही. न्याय्य मागण्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठ्या चालविल्या जातात, याचे शब्दरूपी प्रहाराने उत्तर दिले जाईल. त्यासाठी विदर्भातील शंभर गावांत सरकारच्या पोलखोल सभा घेतल्या जातील. त्याची सुरुवात कठोरा, रेवसा, वलगाव येथे शुक्रवारी (ता. ६) केली जात असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.