कारागृहातील कैदीही होणार ‘टेक्‍नोसॅव्ही’

अनिल कांबळे 
मंगळवार, 23 मे 2017

नागपूर - मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना वसंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्‍त विद्यापीठ तसेच कारागृह प्रशासनाच्या संयुक्‍त उपक्रमाच्या माध्यमातून पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याही पुढे आता कैद्यांना संगणकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कारागृह प्रशासनानेही याकरिता दहा संगणक उपलब्ध  करून दिले आहेत. 

बहुतांश कैदी नकळत वा संतापाच्या भरात झालेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतात. शिक्षा भोगताना पश्‍चातापाची भावना त्यांना अस्वस्थ करते. दुसरीकडे शिक्षा पूर्ण झाल्यानंतर समाजात त्यांना सहसा स्वीकारले जात नाही. प्रशिक्षण नसल्यामुळे हाताला कामही मिळत नाही. यामुळे ते पुन्हा गुन्हेविश्‍वाकडे वळण्याची शक्‍यता अधिक असते. ही बाब हेरून कारागृह प्रशासनाने  कैद्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि ज्ञानदानाच्या प्रवाहात आणण्याचे ठरविले आहे. कारागृहात योगेश पाटील गुरुजींकडे कैद्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात आली. इच्छुक कैद्यांना नियमितपणे संगणकाचे धडे दिले जात आहेत. आधुनिक युगात सुसंगत अशी संगणकाची माहिती, ते हाताळण्यासाठी प्राथमिक स्वरूपात संगणक ओळख प्रमाणपत्र प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत संगणाकांची संख्या वाढविण्यात येणार असून प्रत्येक कैद्याला ‘टेक्‍नोसॅव्ही’ बनविण्याचा कारागृह प्रशासनाचा प्रयत्न आहे.

कार्यालयीन कामात मदत
अनेक कैद्यांना संगणकाचे चांगले ज्ञान आहे. त्यांच्यासह प्रशिक्षण देण्यात आलेले सर्व कैदी कार्यालयीन कामासाठी उपयोगी ठरतात. त्यांच्याकडून नावांची यादी, तक्‍ते, वेळापत्रक, साधी पत्रे तयार करून घेणे आदी कामे करून घेतली जातात.