रेल्वेमंत्र्यांच्या स्वागतासाठी रुळांना पेंट!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

सुरक्षा यंत्रणांनी कार्यक्रमस्थळाचा ताबा घेतला असून, ठिकठिकाणी तपासणी व संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. संपूर्ण तामझाम पश्‍चिमद्वाराच्या दिशेनेच आहे.

नागपूर : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नागपूर आगमनानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे. नागपूर रेल्वेस्थानक चकाचक झाले आहे. थेट रेल्वे रुळाच्या डेन्टिंग पेंटिंगवरही खर्च सुरू आहे. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठी प्रतीक्षालय ताब्यात घेऊन वातानुकूलित मंच तयार केला आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे सोमवारी रात्री नागपुरात आगमन झाले. ते उद्या सकाळी सव्वाअकरा वाजता मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाशी संबंधित विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करणार आहेत. याच सोहळ्यात त्यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून अजनी-पुणे वातानुकूलित एक्‍स्प्रेसचा शुभारंभही करण्यात येईल. सोहळा हायटेक करण्याचे पुरेपूर प्रयत्न प्रशासनाने केले आहे.

प्रवाशांना बसण्याची जागा असलेल्या प्रतीक्षालयात हा सोहळा होणार असल्याने लगतचा स्वयंचलित जिना बंद ठेवला आहे. सुरक्षा यंत्रणांनी कार्यक्रमस्थळाचा ताबा घेतला असून, ठिकठिकाणी तपासणी व संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. संपूर्ण तामझाम पश्‍चिमद्वाराच्या दिशेनेच आहे. पूर्व गेटकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते. पूर्वद्वारावरील स्कॅनर सोमवारी बंद होते. रेल्वेमंत्री ऐनवेळी फलाटावर फिरण्याची शक्‍यता लक्षात घेऊन फलाट क्रमांक 1 चकाचक करण्यात आला. अन्य फलाटांची अवस्था मात्र "जैसे थे' आहे.