चांदपुरात रेल्वे पोहोचल्यास पर्यटनात पडणार भर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

चांदपूर - भंडारा जिल्ह्यातील जागृत हनुमान देवस्थान व सौंदर्याने नटलेली ग्रीनव्हॅली विदर्भात प्रसिद्ध आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेशातूनही भाविक येथे हजेरी लावतात. चांदपुरात रेल्वे पोहोचल्यास पर्यटन विकासात मोठी भर पडू शकते. त्यामुळे येथे रेल्वे मार्गाची जोडणी करून रेल्वेगाडी सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर अशा आशयाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत मांडणार आहेत. चांदपूर हे गाव तुमसरवरून २२ किलोमीटर तर गोबरवाही रेल्वे मार्गावरून ९ किलोमीटर अंतरावर आहे. तुमसर हे तालुक्‍याचे ठिकाण असून, येथे नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे याच महामार्गावरून चांदपूरकरिता टॅक्‍सी, एस. टी. बसेस उपलब्ध होतात. मागील वर्षभरापासून तिरोडा डेपोच्या एस. टी. बसेससुद्धा आता उपलब्ध झालेल्या आहेत. तुमसर-बपेरा महामार्गावरून चुल्हाड (गोंदेखारी) जोडरस्त्यावरून चांदपूरकरिता मार्ग येतो. 

ग्रीनव्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ मध्यंतरी ओसाड पडले होते. इकोटुरिझमच्या माध्यमातून वनविभागाच्या सहकार्याने ग्रीनव्हॅली पुन्हा नयनरम्य बनणार आहे. यात बोटिंग, बालोद्यान, हॉटेल्स, गार्डन, वनफेरीकरिता मिनी ट्रेन अशा नवनवीन सुखसुविधा उपलब्ध होणार अशी माहिती आहे. 

पर्यटकांना निसर्गनंदासह वाघ, बिबट, मोर, हरीण यासारख्या वन्यप्राण्यांचे दर्शन होते. पाहिजे त्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ करण्याकरिता अनेक नवनवीन सुखसुविधा शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापारी, व्यावसायिक तसेच गावकऱ्यांनी केली आहे.

सध्या परिसरात उद्योगधंदे नसल्याने अनेक सुशिक्षित युवक बेरोजगार आहेत. रोजगाराकरिता नागपूर, पुणे, मुंबई व अन्य ठिकाणी धाव घेत आहेत. चांदपूरचा त्या दृष्टीने विकास झाल्यास रोजगारांच्या संधी त्यांना गावातच उपलब्ध होतील. यासाठी लोकप्रतनिधींनीसुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे.  

- तुलाराम बागडे, सचिव, हनुमान देवस्थान ट्रस्ट, चांदपूर.