जीवनदायीकरिता रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

नागपूर - राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत गरीब रुग्णांवर उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारल्याने केशव हॉस्पिटलची मान्यता निलंबित करण्यात आली. धंतोली येथील क्रिसेंट हार्ट हॉस्पिटल व शतायू हॉस्पिटलला रुग्णांकडून पॅकेजपेक्षा अतिरिक्त घेतलेले शुल्क परत करण्याचे आदेश दिले, तर मेडीट्रिना व क्रिसेंट हॉस्पिटला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या जिल्हा नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. हॉस्पिटलकडून पॅकेजपेक्षाही जास्त रक्कम घेण्यात आल्याच्या ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली. अमरावती येथील अब्दुल रहीम रहेमान यांच्यावर क्रिसेंट हार्ट हॉस्पिटल धंतोली येथे
 राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित हॉस्पिटलकडून पॅकेज व्यतिरिक्त ५९ हजार ५०० रुपये अतिरिक्त शुल्क घेतल्याची तक्रार दाखल केली. तुषार सरोदे यांच्यावर किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये अतिरिक्त घेतल्यासंदर्भात ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात  आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन्ही रुग्णांना हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्क परत केले.

प्रशासनाकडून नऊ तक्रारी दाखल झाल्या. यापैकी तीन तक्रारींचे निकाली काढण्यात  आल्या. मानेवाडा येथील केशव हॉस्पिटलबद्दल रुग्णांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. चौकशी करून केशव हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात आली. मेडिट्रिना व क्रिसेंट या हॉस्पिटलला कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा (पॅकेजपेक्षा) अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असल्यास जनतेने टोल फ्री क्रमांक १८००२३३२२०० अथवा ऑनलाइन www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.