रामटेकच्या तरुणाने पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

प्रशील ढोमणे
प्रशील ढोमणे

रामटेकच्या तरुणाने पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
नागपूर, ता. 21 ः मद्रास रेजिमेंटमध्ये कार्यरत रामटेकचा कॅप्टन प्रशील ढोमणे या तरुणाच्या नेतृत्वात केरळमधील 2500 पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले. प्रशीलच्या नेतृत्वातील सत्तर जवानांच्या टीमने जोखीम पत्करून हे रेस्क्‍यू ऑपरेशन यशस्वी पूर्ण केले. सलग दहा दिवस या कार्यात संपूर्ण टीमने स्वतःला झोकून देत अनेकांचे प्राणही वाचवले.
मूळचा रामटेकचा असलेला प्रशील प्रवीण ढोमणे सध्या भारतीय सैन्य दलातील मद्रास रेजिमेंटच्या 19 बटालियनमध्ये त्रिवेंद्रम शहरात पोस्टिंगवर आहे. केरळमध्ये पावसाच्या रौद्र रुपाने शेकडोंचे प्राण गेले आणि लाखोंचे संसार उघड्यावर आले. या आक्रमणातून केरळवासीयांना वाचविण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या. त्याचवेळी एर्नाकुलममधील अलुवा, पुथेनवेलिका व आसपासच्या गावांमध्ये प्रशीलच्या नेतृत्वातील सत्तर जवान पोहोचले. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी या जवानांना हाक दिली त्यावेळी हजारो लोक पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. सुरुवातीला बहुतांशी गावकऱ्यांनी स्वीकारले नाही. मदत स्वीकारण्यासही काहींनी नकार दिला. पण, अशातही या सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी प्रशील व त्याच्या टीमवर होती. प्रशीलसह त्याच्या नेतृत्वातील जवानांनी गावकऱ्यांना आपले मोबाईल नंबर दिले. ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जायला लागली, अनेकांनी फोन करून मदतीची मागणी केली. प्रत्येक ठिकाणी जवान पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आली. अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करून, पाच ते सहा फूट पाण्याची पातळी असलेल्या ठिकाणी पोहोचून प्रशीलच्या नेतृत्वात संपूर्ण टीमने दहा दिवसांमध्ये अडीच हजारांपेक्षा अधिक लोकांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले.
दररोज चारशेपेक्षा अधिक लोकांना कॅम्पपर्यंत पोहोचविण्याचे काम या सर्वांनी केले. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी सियाचीनमधील हिमस्खलन घटनेच्या वेळी उणे 45 डिग्री तापमानात प्रशीलने अतिशय प्रभावी रेस्क्‍यू ऑपरेशन राबविले होते. प्रशीलची आई शिल्पा, त्याचे आजी-आजोबा व साऱ्या कुटुंबीयांनी त्याच्याकडून देशाची अधिकाधिक सेवा घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

एका गावात नऊ महिन्यांची गर्भवती पुराच्या पाण्यात अडकली होती. तिला घरातून बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. माझ्या टीमधील सुभेदार नौशाद व त्याचे साथीदार तेथपर्यंत पोहोचले. त्या महिलेला एका खाटेवर ठेऊन सर्वांनी पाच फूट पाण्यातून चालत या महिलेला सैन्याच्या ट्रकपर्यंत आणले. हा ट्रक थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी तिने एका मुलाला जन्म दिला. आमच्यासाठी हा अनुभव थ्रीलिंग होता.
- कॅप्टन प्रशील ढोमणे, मद्रास रेजिमेंट - 19 बटालियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com