चक्रव्यूह भेदून मुख्यमंत्र्यांचे सारथी ठरले 'रण'जीत! 

ranjit patil
ranjit patil

अकोला - महाभारतातील रणसंग्रामात स्वकियांच्याच चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी स्थिती अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत डॉ. रणजित पाटील यांच्यावर आली होती. मात्र, अत्यंत अचूक नियोजन, संयम आणि पदवीधरांसाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मतदारांपर्यंत मांडून त्यांनी निवडणुकीचे चक्रव्यूह यशस्वीरीत्या भेदले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे सारथी असलेले डॉ. रणजित पाटील यांनी एकतर्फी विजयाचा षटकार मारत खऱ्या अर्थाने "रण'"रण'जीत ठरले. 

राज्यात विधानपरिषदेच्या पाच शिक्षक व दोन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल आज पूर्णपणे जाहीर झाला. विधानसभेत बहुमत असलेल्या भाजपने विधान परिषदेत संख्याबळ वाढविण्यासाठी कंबर कसत स्वबळावर पाचही मतदार संघात प्रचाराची रणनीती आखली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असलेले रणजित पाटील यांच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शिक्षक संघटनांचा बोलबाला असलेल्या या मतदार संघात मागच्या निवडणुकीत भाजपचे रणजित पाटील यांनी नुटाचे ज्येष्ठ आमदार बी. टी. देशमुख यांचा पराभव करून विधानपरिषदेत प्रवेश केला होता.

त्यानंतर या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीनेही उडी घेत कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले. त्यासोबतच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे प्रा. डॉ. दीपक धोटे यांच्यासह तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदार संघातील राजकीय, सामाजिक समीकरण आणि सरकारविषयी उठविण्यात आलेल्या वावड्या लक्षात घेता ही निवडणुकीत डॉ. रणजित पाटील यांच्यासाठी अटी-तटीची होईल असल्याचे बोलले जात होते. मात्र, गत दीड वर्षांपासून मतदारसंघ पिंजून काढत शासनाने पदवीधर, शिक्षकांसाठी केलेल्या कार्याचा लेखा-जोखा मांडत रणजित पाटील यांच्यासह भाजप आणि संघाने निवडणुकीची प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळली. भाजपमधील अंतर्गत गटा-तटाचे राजकारण पाहता त्याचा फटका पाटील यांना बसणार असल्याची शक्‍यता व्यक्त होत होती. मात्र, मितभाषी डॉ. पाटील यांनी अत्यंत संयमाने निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप टाळत केवळ पदवीधरांच्या विकासावर फोकस केला. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने पदवीधर मतदारांना कौशल्य विकास आणि रोजगारांच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचे दिलेले आश्वासनही या निवडणुकीत रणजित पाटील यांच्यासाठी जमेची बाजू ठरले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी अमरावतीमध्ये येथे जंगी प्रचार सभा घेऊन अमरावती विभागातील पाच जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय रणजित पाटलांच्या माध्यमातून तुमच्या सेवेत तत्पर असल्याचे सांगितल्याने हा मुद्दाही मतदारांना आकर्षित करणारा ठरला.

निवडणूक काळात स्वपक्षियांसोबतच विरोधकांना अनेक मुद्यावरून पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या संपत्तीसह सरकारने शिक्षक विरोधी घेतलेल्या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात भांडवल करण्यात आले. मात्र, प्रथम, दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीच्या मतांची आकडेवारी पाहता विरोधकांना चीत करीत मुख्यमंत्र्यांच्या या विश्‍वासू सहकाऱ्याने एकतर्फीच विजय मिळवला 

नोटाबंदीचा परिणाम नाही 
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे विरोधकांनी या निवडणुकीत जोरदार भांडवल केले असले तरी त्याचा फारसा परिणाम भाजपच्या या निवडणूक निकालावर पडला नाही. पदवीधर निवडणुकीच्या यशानंतर आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचा मार्ग प्रशस्त करणारा ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com