विद्यापीठ ही "इनोव्हेशन' करणारी संस्था 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नागपूर - संशोधनातून देशाचा विकास साधता येणे शक्‍य आहे. हे संशोधन करताना, त्यातून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हान देशासमोर आहे. मात्र, हे आव्हान पेलण्याची शक्ती विद्यापीठामध्ये असलेल्या नामवंत संस्थांमध्ये आहे. त्यामुळेच विद्यापीठ हीच खऱ्या अर्थाने इनोव्हेशन करणारी संस्था असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण आणि आयसीटी मुंबईचे माजी संचालक डॉ. मनमोहन शर्मा यांनी केले. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित तीनदिवसीय परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्रमुख पाहुणे कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, एलआयटीचे संचालक डॉ. राजू मानकर, बीसीयूडी संचालक डॉ. डी. के. अग्रवाल उपस्थित होते. डॉ. मनमोहन शर्मा म्हणाले, देशाची अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा विकास होण्यासाठी अधिकाधिक संशोधन होणे गरजेचे आहे. मूलभूत संशोधनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण मूलभूत संशोधन हे समाजासाठी उपयुक्त आहे. दुर्दैवाने भारतात केवळ त्यावर बोलले जाते. विज्ञानाने सामान्यांचे आयुष्य बदलू शकते. विज्ञानातील रसायनशास्त्र हे सर्वांशी निगडित असलेले शास्त्र आहे. एलआयटीसंदर्भात बोलताना या संस्थेने बरेच जागतिक स्तरावरील विद्यार्थी दिले. आजही संस्थेत नामवंत प्राध्यापकांचा समावेश आहे. त्यातून भविष्यातही असेच विद्यार्थी तयार केल्या जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी एलआयटीचा गौरव परत मिळवून देण्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाने काम करावे, असे प्रतिपादन केले. कुलगुरू डॉ. काणे यांनी विद्यापीठाद्वारे एलआयटीला स्वायतत्ता मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डी. लक्ष्मीनारायण यांच्या परिवाराचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय डॉ. मनमोहन शर्मा यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. शर्मा यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले. आभार कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी मानले.