वंचितांच्या देवाला भेटून भारावला क्रिकेटचा देव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पद्मश्री आणि रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत आले होते. ही माहिती सचिन तेंडुलकरला होताच त्याने आमटे दाम्पत्याला आपल्या निवासस्थानी रविवारी (ता. 1) सकाळी आमंत्रित केले.

गडचिरोली : गेल्या साडेचार दशकांपासून गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम, मागास जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या दु:खांवर मायेची फुंकर घालणाऱ्या डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांचे सेवाकार्य अखंड सुरू आहे. अनेक वंचितांना ते देवासमानच वाटतात. अशा या देवमाणसांना भेटून क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला भारतरत्न सचिन तेंडुलकरही भारावून गेला. निमित्त होते आमटे दाम्पत्य आणि सचिनच्या मुंबई येथील भेटीचे. 

पद्मश्री आणि रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत आले होते. ही माहिती सचिन तेंडुलकरला होताच त्याने आमटे दाम्पत्याला आपल्या निवासस्थानी रविवारी (ता. 1) सकाळी आमंत्रित केले. यावेळी सचिनने आमटे दाम्पत्याच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली आणि तब्बल दीड तास त्यांच्या खडतर जीवनप्रवासातील अनुभव ऐकले. या भेटीत सचिनला घडविणाऱ्या त्याच्या आईशीही आमटे दाम्पत्याची दीर्घ चर्चा झाली.

सुमारे 45 वर्षांपूर्वी भामरागड तालुक्‍यातील हेमलकसा येथील घनदाट जंगलात प्रारंभ केलेली आरोग्यसेवा, तेव्हाचे आदिवासींचे जीवन, त्यांच्या समस्या, सुविधांचा अभाव, वन्यजीवांचे हल्ले, विविध आजार, माणसांचे वन्यजीवन यातून मार्ग काढत आरोग्यसेवा देतानाच जंगलातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उत्थानासाठी केलेला जिवाचा आटापिटा, मार्गात आलेल्या अनंत अडचणी व त्यावर हिंमतीने केलेली मात, अशा अनेक रोमांचक घटनांची माहिती घेताना सचिन भारावून गेला. मी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्यापेक्षा आपले समाजसेवेचे कार्य कैकपटीने मोठे आहे, असे भावोद्गार सचिनने यावेळी काढले. अनेक वर्षांपासून आमटे दाम्पत्याला भेटायची इच्छा आज पूर्ण झाल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. सचिनच्या आईनेही त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा करत आपण "प्रकाश आमटे-द रिअल हीरो' हा चित्रपट बघितल्याचे सांगितले.

Web Title: Sachin Tendulkar meet Amte family in Gadchiroli