सतीश उके यांना हायकोर्टाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नागपूर - नागपूर खंडपीठातील अवमान कारवाईविरुद्ध ऍड. सतीश उके यांनी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्यपीठात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्तिद्वय एस. सी. धर्माधिकारी आणि प्रकाश नायक यांच्या न्यायपीठाने फेटाळलेल्या या याचिकेमुळे ऍड. उके यांना दणका बसला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात काही गुन्ह्यांची माहिती नमूद केली नसल्यामुळे त्यांची उमेदवारी बेकायदेशीर आहे, असा दावा करणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ऍड. उके यांनी दाखल केली होती. ती याचिका न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांनी फेटाळली होती. तसेच ऍड. उके यांच्यावर सुमोटो अवमान याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी न्यायमूर्तिद्वय प्रसन्ना वराळे आणि झका हक यांच्या विशेष खंडपीठाने उके यांना दोन महिने कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.

हा तर अनादर ठरेल
ऍड. उके यांनी मुख्यपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणे म्हणजे आपल्याच न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अनादर व्यक्त करणे होय, असे निरीक्षण न्यायमूर्तिद्वय एस. सी. धर्माधिकारी आणि प्रकाश नायक यांच्या न्यायपीठाने नोंदविले. तसेच न्यायाधीशांनी आपली बंधुता आणि न्यायाधीशांचा आदर करणे आवश्‍यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.