संरक्षक भिंत कोसळून पाच विद्यार्थिनी जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

सावनेर - निर्माणाधीन शाळेच्या गच्चीवरील संरक्षक भिंत (पॅरापेट वॉल) खचून अंगावर पडल्याने पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या. ही घटना बुधवारी (ता. १९) दुपारी बाराच्या सुमारास सावनेर बस स्थानकाजवळील जवाहर कन्या हायस्कूलमध्ये घडली. सर्व जखमींवर नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.  

साक्षी प्रवीण वाडबुधे (१४ वर्षे, वर्ग ९ वा), कल्पना सूर्यभान पाटील (१४ वर्षे, वर्ग ९ वा), रेणुका महादेव काळे (१४ वर्षे, वर्ग ५ वा), आशा चंद्रभान ढवळे (१४ वर्षे, वर्ग ९ वा), सानिया नदीम शेख (१४ वर्षे, वर्ग ९ वा) अशी जखमींची नावे आहेत. दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे नुकतीच बांधण्यात आलेल्या भिंतीची बांधणी खिळखिळी झाली. बुधवारी सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्याने विद्यार्थिनी घरी जात असताना भिंतीचा काही भाग कोसळला. यात पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या.

जखमींना प्रथम सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूरच्या सीताबर्डी येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थिनींच्या डोक्‍याला मार लागला असल्याने सीटी स्कॅन करण्यात आले. सर्वच जखमींची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.  

बांधकाम नियमांना बगल
सावनेरच्या मुख्याधिकारी संघमित्रा ढोके, नगर परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. अरविंद लोधी यांनी घटनास्थळ तसेच रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. शाळेसाठीच्या नियमांनुसार कोणतेही बांधकाम उन्हाळी सुट्यामध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, शाळा सुरू होऊन महिना होत असताना जवाहर कन्याशाळेचे बांधकाम सुरू होते. नियमाला बगल देऊन बांधकाम केल्याप्रकरणी त्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश ढोके यांनी दिले. या बांधकामाची परवानगी घेतली नसल्याचेही सांगितले जाते.