तीन मुलांच्या बापाने रचला दुसरा विवाह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मुलांसह पहिल्या पत्नीचे लग्नमंडपात आगमन - दोन्ही पक्षांकडून वराविरुद्ध तक्रार

मुलांसह पहिल्या पत्नीचे लग्नमंडपात आगमन - दोन्ही पक्षांकडून वराविरुद्ध तक्रार
पथ्रोट (जि. अमरावती)  - वऱ्हाड्यांनी भरलेल्या लग्नमंडपात सर्व मंगलाष्टके होऊन कुर्यात सदा मंगलम्‌ म्हणीत वधूवरांवर अक्षदा फेकण्यात आल्या. आनंदात विवाहसोहळा पार पडला. परंतु, काही क्षणात बोहल्यावर दिसणाऱ्या नवरदेवाची पहिली पत्नी चक्क आपल्या दोन मुलांना घेऊन लग्नमंडपात दाखल होताच एकच हलकल्लोळ माजला. या पहिल्या पत्नीने थेट पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध तर ज्या मुलीचा विवाह झाला तिच्या पालकांनी नवरदेवाविरुद्ध तक्रार दाखल केली. ही घटना आज, गुरुवारी घडली.

यवतमाळ शहरातील जयस्तंभ चौकात सेंट्रिंगचा व्यवसाय करणाऱ्या अंकुश शंकर दोडके (वय 27) याची याच परिसरात प्लास्टिक पन्न्या वेचून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या एका युवतीशी (वय 22) ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात व त्यानंतर विवाहात झाले. या युवतीला अंकुशपासून अनुक्रमे चार, तीन व दीड वर्षे वयाची तीन अपत्ये झाली, असा या युवतीचा दावा आहे. काही दिवसांपूर्वी अंकुश यवतामाळातून अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे या युवतीने यवतमाळच्या वडगाव पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली.
दरम्यान, यवतमाळ नजीकच्या गावांत त्याचा शोध घेत असताना मसोला गावातील एका महिलेने अंकुश आज अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथे एका मुलीसोबत विवाह करीत असल्याचे सांगितले. त्यावरून या युवतीने क्षणाचाही विलंब न करता दीड वर्षाच्या चिमुकल्याला घरी ठेवून दोन चिमुकल्यांसह पथ्रोट गाठले. इकडे अंकुश व पथ्रोट येथील एका युवतीचा विवाहसोहळा नुकताच पार पडल होता. अचानक दोन मुलांना घेऊन लग्नमंडपात दाखल झालेल्या या युवतीने आपण अंकुशसोबत यवतामाळच्या महादेव मंदिरात विवाह केला.

त्याच्यापासून आपल्याला तीन अपत्ये असल्याचे सांगताच साऱ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली. तिने थेट पथ्रोट पोलिसांत अंकुशविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नवरदेव असलेल्या अंकुशला चौकशीसाठी ठाण्यात बोलाविले. काही वेळाने ज्या मुलीसोबत अंकुशचा आज विवाह झाला; त्या मुलीच्या पालकांनीही नवरदेव असलेल्या अंकुशविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.