भाजपमध्ये येणार नाराजीचे वादळ 

श्रीकांत पाचकवडे
सोमवार, 23 जानेवारी 2017

अकोला : महापालिकेच्या रणसंग्रामात स्वबळावर लढण्याची तयारी करणाऱ्या भाजपमध्ये सध्या उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. वीस प्रभागातून नगरसेवक निवडून द्यावयाचे असून, त्यासाठी सर्व प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती भाजपने घेतल्या आहेत. प्रदेश व स्थानिक पातळीवर युतीची चर्चा सुरू आहे. युती झाल्यास भाजपला सेनेशी वाटाघाटी करावी लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमधील असंतुष्टांची नाराजी डोके वर काढण्याची शक्‍यता आहे. 

अकोला : महापालिकेच्या रणसंग्रामात स्वबळावर लढण्याची तयारी करणाऱ्या भाजपमध्ये सध्या उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. वीस प्रभागातून नगरसेवक निवडून द्यावयाचे असून, त्यासाठी सर्व प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती भाजपने घेतल्या आहेत. प्रदेश व स्थानिक पातळीवर युतीची चर्चा सुरू आहे. युती झाल्यास भाजपला सेनेशी वाटाघाटी करावी लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमधील असंतुष्टांची नाराजी डोके वर काढण्याची शक्‍यता आहे. 

अकोला महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान आहे. नगरपालिकेत मिळालेल्या भरीव यशानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यातूनच महापालिका निवडणुकीच्या रंणसंग्रामात भाजपने एकट्‌आने लढण्याचा नारा देत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. महानगरातील वीसही प्रभागात भाजपच्या निवडणूक 'कोअर कमिटी'ने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, एकाच प्रभागात विद्यमान नगरसेवकांसह पक्षातील इतरही इच्छुक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी दावा केल्याने पक्षातंर्गत राजकीय वातावरण तापले आहे. महानगरातील अनेक प्रभागात एका-एका जागेसाठी भाजपमध्ये तीन-चार इच्छुक आहेत. त्यामुळे नक्की कोणाची समजुत काढावी? या संभ्रमात स्थानिक नेत्यांचा कस लागत आहे. 

गेल्या निवडणुकीत आश्वासने मिळालेले अनेक कार्यकर्ते 'वेटिंग'वर आहेत. या निवडणुकीत संधी न मिळाल्यास पुन्हा पाच वर्ष थांबावे लागणार आहे. त्यामुळे 'अभी नही, तो कभी नही' अशी मानसिकता झालेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. विशेष म्हणजे, हद्दवाढीनंतर महानगरातील प्रभागाचे आकारमान वाढल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागातील राजकीय गणित बिघडले आहे. प्रभागात नवीन भाग समाविष्ट झाल्याने तेथील सामाजिक समीकरणांवर विजयाचे गणित मांडले जाणार आहे. त्यामुळे आपल्या सोयीच्या उमेदवारांना तिकीट मिळाल्यास विजयाचा मार्ग सुकर होणार असल्याने त्यासाठीही अनेकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. 

भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास भाजप-सेनेचीही युती होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सेनेला जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे भाजपच्या जागा कमी होणार आहेत. आधीच काही जागा या मुस्लिम आणि अनुसुचित जाती प्रभावित असल्याने उर्वरित जागांवर भाजपची भिस्त आहे. त्यातही शिवसेनेला वाटा दिल्यास भाजपमधील अनेक इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्‍यता आहे. अशावेळी त्यांची समजूत काढणे कठिण होईल. दुसरीकडे पक्षांतराने त्रस्त झालेल्या शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपमधील असंतुष्टांना शिवसेनेने वाट मोकळी करून दिल्यास भाजपसाठी पुढील काळ अडचणीचा ठरू शकतो. 

अनेकांच्या मुंबई-नागपूर वाऱ्या 
महापालिकेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांकडून डावलले जाण्याची शक्‍यता असल्याने भाजपच्या काही इच्छुक उमेदवारांनी प्रदेश नेत्यांकडे 'फिल्डिंग' लावली आहे. या कार्यकर्त्यांच्या मुंबई आणि नागपुरच्या वाऱ्या वाढल्या असून नेत्यांना आपली पक्षनिष्ठा व जातीय समीकरणे पटवून देत उमेदवारी देण्यासाठी गळ घालण्यात येत आहे.