श्रीकृष्णधाम जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

भूमाफिया दिलीप ग्वालवंशी प्रकरण - खंडणीचे पुन्हा दोन गुन्हे
नागपूर - भूमाफिया दिलीप ग्वालवंशीने दाभा रिंग रोडवर एक एकर जागा बळकावून सुरू केलेल्या श्रीकृष्णधाम लॉनवर प्रशासनाच्या वतीने बुलडोजर चालविण्यात आला. यानंतर पोलिस संरक्षणात संबंधित जागा मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली.

भूमाफिया दिलीप ग्वालवंशी प्रकरण - खंडणीचे पुन्हा दोन गुन्हे
नागपूर - भूमाफिया दिलीप ग्वालवंशीने दाभा रिंग रोडवर एक एकर जागा बळकावून सुरू केलेल्या श्रीकृष्णधाम लॉनवर प्रशासनाच्या वतीने बुलडोजर चालविण्यात आला. यानंतर पोलिस संरक्षणात संबंधित जागा मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली.

शिक्षक सोसायटीची सुमारे एक एकर जागा ग्वालवंशीने बळजबरीने ताब्यात घेतली होती. त्या जागेवर श्रीकृष्णधाम लॉन नावाने व्यवसाय सुरू केला. मूळ भूखंड मालकांना त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. जवळपास गेल्या सात ते आठ वर्षांपासून हे लॉन बेकायदेशीररीत्या सुरू होते. मात्र, ग्वालवंशीने हडपलेल्या जमिनी पोलिस संरक्षणात मूळ मालकांना परत मिळत आहेत. त्यांची हिंमत पाहून 24 भूखंडधारक आणि त्यांच्या नातेवाइकांनी ग्वालवंशीच्या श्रीकृष्णधाम लॉनची तोडफोड केली. दोन तासांत संपूर्ण लॉन जमीनदोस्त करून भूखंडावर ताबा मिळवला. यासोबतच ग्वालवंशी आणि त्याच्या साथीदारांवर गिट्टीखदान पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी पुन्हा दोन गुन्हे दाखल करण्यात आले. भूखंडावर बेकायदेशीररीत्या कब्जा करून ग्वालवंशीने जिवे मारण्याची धमकी दिली होती. भूमाफिया ग्वालवंशीने पोसलेले गुंड भूमिगत झाले असून, त्याच्या दहशतीला ग्रहण लागले आहे. गावगुंड असलेल्या ग्वालवंशीला भूमाफिया बनविण्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र, पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी भूखंडाच्या मूळ मालकांना जमिनीचा ताबा दिल्याने पीडितांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दिलीप ग्वालवंशीने शहरातील कोट्यवधींच्या जमिनी हडपल्या. गुंडांच्या मदतीने सामान्य नागरिकांचे भूखंड हडपले. शोभा पांडुरंग कोल्हे (वय 65, रा. गणेशपेठ) या पती व नातेवाईक नरेश गोडबोले यांनी हजारीपहाड येथे भूखंड विकत घेतला होता. ते 4 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता भूखंड पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, दिलीप ग्वालवंशी, जगदीश ग्वालवंशी आणि 10 ते 15 युवक शस्त्रांसह भूखंडावर बसले होते. त्यांनी भूखंडाचा ताबा हवा असल्यास 25 हजार रुपये खंडणीची मागणी केली. त्यांच्या अंगावर धावून जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या घटनेत, चरणदास काशीरावजी जयस्वाल (वय 65, हनुमाननगर, मेडिकल चौक) हे 7 जानेवारी 2017 मध्ये हजारीपहाड येथील स्वतःच्या भूखंडावर गेले होते. दरम्यान, दिलीप ग्वालवंशी, पप्पू यादव, छोटू गेंदलाल, जितू अँथोनी आणि त्याचे दहा साथीदार सशस्त्र भूखंडावर उभे होते. त्यांनी जयस्वाल यांना अडवून मारहाण केली. भूखंडावर पुन्हा पाय ठेवायचा नाही आणि खंडणी म्हणून 25 हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

162 लोकांनी घेतला भूखंडांचा ताबा
कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या मानकापुरातील नेताजी हाउसिंग सोसायटीमधील 162 भूखंडांवर दिलीप ग्वालवंशीने कब्जा केला होता. आज शनिवारी सकाळी नागरिकांनी एकच हल्लाबोल करीत ग्वालवंशीचे सोसायटीवरील साम्राज्य नष्ट केले. त्यांनी भूखंडावर ताबा मिळवला. या वेळी त्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले होते.

Web Title: shrikrishnadham Flounder