ध्वनी प्रदुषणाने आरोग्याचे धिंडवडे!

ध्वनी प्रदुषणाने आरोग्याचे धिंडवडे!

अकोला : गीत, संगीताची गोष्ट निघाली की आवाजाच्या सुमधूरतेची चर्चा रंगते. आवाजात मधुरता असली तर जगही जिंकता येते, असे म्हटले जाते. मात्र, हाच आवाज जेव्हा मर्यादा ओलांडतो, कानठळ्या बसवितो, तेव्हा ह्रदयाची स्पंदने वाढतात. जल, वायू प्रदूषणाने काळंवडलेल्या अकोला जिल्ह्यात किमान ध्वनी प्रदूषण तरी नसावे; पण हाय...येथेही दुर्दैवच. जल आणि वायू प्रदूषणाने आरोग्याचे धिंडवडे उडत असतानाच आता ध्वनी प्रदूषणही यात हातभारच लावत आहे.

जिल्ह्यात अलीकडच्या काळात औद्योगिक क्रांती झाली. महाऔष्णिक वीज केंद्र, सिमेंट कंपन्या, उद्योग-व्यवसाय, पॉवर प्लांट यासह अनेक छोटेमोठे उद्योग जिल्ह्यात आहेत. आजघडीला ७५० उद्योग जिल्ह्याच्या भूमीत दिमाखाने उभे आहेत. या उद्योगात शेकडो मशनरीज, हजारो वाहने, जमिनीत खड्डा पाडणाऱ्या मशीन्स आहेत. या मशीनरीजचा आवाज नेहमी औद्योगिक परिसरात घुमत असतो. याशिवाय वाहनांची वाहतूक २४ तास सुरू असते.

ही वाहनांचा रात्रीही प्रवास सुरू राहत असल्याने वाहनांच्या मार्गावरील रहिवासी क्षेत्रात आवाजाचा त्रास जाणवतो. अनेकदा या वाहतुकीमुळे व त्यांच्या हॉर्नमुळे नागरिकांना झोप लागत नाही.

बंदी असल्यावरही बोअरवेल रात्रीच
रात्रीच्या वेळेत कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण होऊ नये, असे स्पष्ट कायद्याचे संकेत आहे. मात्र, बोअरवेल खोदणाऱ्या मशीन्स नेहमी रात्रीच्या वेळेतच सुरू असतात. ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार आवाजाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहे. मात्र, हे नियम कधी कुणी जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट ते पायदळी तुडविले जातात. आधीच नागरिकांचे जीवनमान जल व वायू प्रदूषणाने कमी करून टाकले आहे. आता ध्वनी प्रदूषण गंभीर होऊ पाहत आहे.

कायदा आहे हेच माहीत नाही
वाद्य वाजविण्याला कुणाचीही बंदी नाही. मात्र, त्यासाठी आवाजाच्या मर्यादा आहेत. कायदाही आहे. मात्र, कायदा पाळताना कुणीच दिसत नाही. किंबहुना ध्वनीचेही प्रदूषण असते आणि त्यासाठीही कायदा अस्तित्वात आहे, हेदेखील अनेकांना माहीत नाही. एरवी एखादा कायदा तोडला जाऊ नये म्हणून दक्षतेने काम करणारे पोलीस अधिकारी आणि शासकीय यंत्रणा आवाजाच्या या कायद्याबाबत गंभीर दिसत नाही. ध्वनी प्रदुषणाच्या विरोधात कायदा आहे, हे जरा इतरांनाही कळू देण्याची वेळ निश्चितच आली आहे.

प्रवासी वाहनांचाही कर्णकर्कश आवाज
शासनाकडे नोकऱ्या नाहीत. बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काय रोजगार करावा, हे तरुणांना सुचेनासे होत आहे. अशावेळी ट्रॅक्स, सुमोसारखी वाहने घेऊन त्याचा प्रवासी वाहने म्हणून वापर केला जात आहे. परिणामी प्रवासी वाहने गावागावात सुमार झालेली दिसून येत आहेत. ही वाहने ध्वनी प्रदूषणाबाबत असलेल्या कोणत्याच नियमांचे पालन करीत नाही. प्रवाशांना माहित व्हावे, यासाठी या वाहनांचे हॉर्नही मोठ्या आवाजाचे असतात.

डीजेचा तर फक्त धिंगाणा
सध्या जमाना डीजेचा आहे. कमी आवाजात कुणाचे भागतच नाही. विशेष म्हणजे, हे डिजे १२५ डेसीबल आवाजाचे असतात. असे असले तरी या डीजेला ५० ते ५५ डेसीबल आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र, याचे भान डीजे वाजविणाऱ्याला आणि डीजेच्या तालावर नाचणाऱ्याला नसते. गणपती-देवीच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत सिमीत असलेला हा प्रकार आता चक्क लग्नापर्यंत पोहचला आहे. कानठळ्या बसतील एवढ्या आवाजात डिजे वाजवून तासाप्रमाणे पैसा वसूल करण्याच्या आसुरीवृत्तीपायी ही अतिउत्साही मंडळी इतरांच्या जीवावर उठली आहे.

कर्नकर्कश सायलेंट झोन
शाळा, महाविद्यालय, दवाखाने, न्यायालय परीसर, जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा परीषद सीईओ यांचे निवासस्थान अशी एकून ४०० च्या जवळपास सायलेंट झोन आहेत. मात्र, याठिकाणी सर्रास कर्णकर्कश आवाज एेकण्यात येतो.

ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम
ध्वनीप्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणेे, कानात दडे बसणे, रक्तदाब वाढणे आणि हृदयविकाराच्या तक्रारी निर्माण होणे, अशा प्रकारचे त्रास होतात. शहरी वर्दळ, विसंबद्ध ध्वनी आणि गोंगाट म्हणजेच नागरी संस्कृती, असे समीकरण बनत गेल्याने शहरवासियांची पंचेंद्रिये आणि विशेषतः कर्णेंद्रिये निकामी होत आहेत.

गरोदर स्त्रियांनाही गोंगाटाचा पुष्कळ त्रास होतो आणि मानसिक ताण वाढून संप्रेरकांचे प्रमाण वाढत जाते. साहजिकच अकाली प्रसूती होण्याचे प्रकार घडतात.

ध्वनीप्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना या काळात जगणे नकोसे होते. त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. याकडे जनते इतकेच शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com