एसएससीचे उमेदवार परीक्षेला मुकले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची जोमाने तयारी करत असलेल्या उमेदवारांनी परीक्षेला बसण्याची संधी न मिळाल्याबद्दल "सकाळ' प्रतिनिधीकडे खेद व्यक्त केला. काही उमेदवार बाहेरगावाहून आले होते. त्यांच्यावर आल्या पावली परत जाण्याची नामुष्की ओढवली

नागपूर - स्टाफ सिलेक्‍शन कमिशनद्वारे (एसएससी) रविवारी (ता. 14) घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान रेशीमबाग चौकातील लोकांची शाळा या परीक्षा केंद्रावर "रिपोर्टिंग' वेळेच्या आत येऊनही उमेदवारांना बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुमारे 50 ते 60 उमेदवारांना परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परत पाठविल्यामुळे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले.

गेल्या काही वर्षांमध्ये विविध स्पर्धा परीक्षेला विदर्भातून मोठ्या संख्येने उमेदवार बसतात. तसेच वर्षागणिक उमेदवारांच्या नियुक्तीचे प्रमाणदेखील वाढले आहे. जवळपास प्रत्येकच रविवारी कुठली ना कुठली स्पर्धा परीक्षा शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर सुरू असते. याच अंतर्गत रविवारी विविध पदांकरिता एसएससीतर्फे परीक्षा घेण्यात आली. याकरिता लोकांची शाळा ही परीक्षा केंद्र निवडण्यात आले होते. उमेदवारांना मिळालेल्या प्रवेशपत्रामध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 अशी परीक्षेची वेळ देण्यात आली होती. तर, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर पोहचण्याची वेळ सकाळी 9 वाजता होती. परीक्षा केंद्रावर सकाळी 9.30 वाजेपर्यंत प्रवेश देण्याची अनुमती असल्याचे प्रवेशपत्रावर स्पष्ट लिहिण्यात आलेले आहे. तरीदेखील परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी 9.30 च्या आत येणाऱ्या उमेदवारांना हाकलून लावले. याला उमेदवारांनी विरोध केला असता त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची माहिती आहे.

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांमध्ये नागपूरसह विदर्भातील उमेदवारांचा समावेश असतो. बरेचदा बस, रेल्वे यांना होणाऱ्या विलंबामुळे उमेदवार वेळेच्या आत परीक्षा केंद्रावर पोहचू शकत नाही. अशावेळी मानवीय दृष्टिकोन लक्षात घेत थोडा फार विलंब झाल्यावरही परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येते. यापूर्वी अशा सहृदयतेची बरीच प्रकरणे घडली आहेत. उमेदवारांची मेहनत, त्यांनी वर्षानुवर्षे केलेला अभ्यास वाया जाऊ नये या उद्देशाने उमेदवारांप्रती सहानुभूती दाखविण्यात येते. मात्र, लोकांची शाळा या परीक्षा केंद्रावर महिला उमेदवारांना अक्षरशः हात पकडून केंद्रावरून बाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार घडला. याविरुद्ध उमेदवार जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून एसएससीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदविणार असल्याचे सांगितले.

संधी गेली वाया
गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची जोमाने तयारी करत असलेल्या उमेदवारांनी परीक्षेला बसण्याची संधी न मिळाल्याबद्दल "सकाळ' प्रतिनिधीकडे खेद व्यक्त केला. काही उमेदवार बाहेरगावाहून आले होते. त्यांच्यावर आल्या पावली परत जाण्याची नामुष्की ओढवली. तर, काही उमेदवार पेपर सुटेस्तोवर परीक्षा केंद्राबाहेर नैराश्‍यपूर्ण नजरेने ताटकळत उभे होते.

Web Title: ssc aspirants missed the examination