टाटा ट्रस्टचे सरकारला सहकार्य - रतन टाटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नवे विकसित रूप तयार करण्याची संकल्पना जाहीर केली. त्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे.

चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नवे विकसित रूप तयार करण्याची संकल्पना जाहीर केली. त्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे.

त्याचे प्रतिबिंब चंद्रपुरात बघायला मिळत आहे. या प्रक्रियेत वित्तमंत्री मुनगंटीवार यांचे मोलाचे सहकार्य आहे. विकासाच्या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्हा अग्रणी ठरेल. विकासाच्या या पर्वाला टाटा ट्रस्ट राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही उद्योगपती रतन टाटा यांनी दिली.
चांदा क्‍लब ग्राउंडवर गुरुवारी जनसमुदायाच्या साक्षीत टाटा ट्रस्ट आणि वनविभागात चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत सामंजस्य करार झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते. व्यासपीठावर वित्त, वन आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, की "टाटा ट्रस्ट' या शीर्षकातच विश्‍वास आहे. टाटा म्हणजे गुणवत्ता आणि प्रगती यांचे प्रतीक आहे. बांबूच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, कौशल्य विकासासह प्रगतीची नवनवीन शिखरे आम्ही गाठू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केली. बांबूच्या खुर्चीवर बसून अभिनव पद्धतीने बांबू प्रशिक्षण केंद्राच्या सामंजस्य करारावर टाटा ट्रस्टचे विश्‍वस्त व्यंकटरमण, मुख्य वनसंरक्षक शेळके यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर हा करार रतन टाटा व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपूर्द करण्यात आला.