दुष्काळी भागात वसुलीसाठी पठाणी कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

योजना सुरळीत सुरू रहावी, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती विभाग यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात पाणी समस्या निर्माण होणार नाही, ही जबाबदारी घेऊन कार्य करणे आवश्यक असताना या तालुक्यात जनतेच्या भावनेचा खेळ सुरू आहे.

संग्रामपूर (बुलडाणा) - तालुका दुष्काळग्रस्त जाहीर असताना वसुली अभावी 140 गाव वाणधरण योजनेतून खारपान पट्ट्यातील 30 ते 40 गावाचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. याकडे तालुका गटविकास अधिकारी यांनी प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. सद्यःस्तिथीत उनाचा पारा वाढत असल्याने खारपान पट्ट्यातील पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण करीत आहे. यासाठी संजीवनी ठरू पाहणारी वाण धरण 140 गाव पाणी पुरवठा योजना वसुली अभावी चर्चेत येत आहे. योजना सुरळीत सुरू रहावी, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती विभाग यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात पाणी समस्या निर्माण होणार नाही, ही जबाबदारी घेऊन कार्य करणे आवश्यक असताना या तालुक्यात जनतेच्या भावनेचा खेळ सुरू आहे.

खार पान पट्टा आणि दुष्काळग्रस्त भाग शासन स्तरावरून जाहीर झाला असताना पिण्याचे पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वाण धरण इरिगेशन अकोलाचे या तालुक्यातील योजनेकडे चाळीस लाख रुपये थकीत असल्याची माहीती महाराष्ट्र जीवन प्राधिकरन चे सहायक कार्यकारी अभियंता शेळके यांनी दिली. त्यातून 14 लाख रुपये भरणा करण्यात आल्याने काही गावात पानी पुरवठा सुरू आहे. उर्वरित 30 ते 40 गावातील वसुली झालेवर पैसे भरणा करून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शासनाचे परिपत्रकानुसार दुष्काळग्रस्त भागात सक्तीने वसुली करता येत नाही. सोबतच वसुली अभावी सुविधा खंडित करता येत नाहीत. असे असताना या तालुक्यात हा नियम पाणीपुरवठा योजनेला लागू होत नाही का? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. वाणची ही पाणी पुरवठा योजना खारपान पट्ट्यातील नागरिकांसाठी वरदायिनी ठरणारी असल्याने ती सुरळीत सुरू राहण्यासाठी वसुली हा मुख्य पाया म्हणावा लागेल. त्यासाठी दुष्काळ परिस्तिथी पाहता पंचायत समिती स्तरावरून विशेष सामान्य फंडातून निधी उपलब्ध करून दिल्यास हा पाणी टंचाईसाठी नागरिकांच्या हिताचा भाग ठरेल!

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Taxes Recovery done in the drought prone areas