25 वर्षांनंतर शिक्षकांना मिळाले स्थायित्व प्रमाणपत्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

आंतरजिल्हा बदलीतील अडथळा दूर - चार हजारांवर शिक्षकांना दिलासा
नागपूर - शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी शासनाने अनिवार्य केलेले स्थायित्व प्रमाणपत्र तब्बल 25 वर्षांच्या संघर्ष आणि पाठपुराव्यांनंतर शिक्षकांच्या हाती पडले. त्यामुळे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग काहीसा सुकर होणार आहे.

जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी शासन आणि शिक्षण विभाग नवीन नियम तयार करून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला फाटा देण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरजिल्हा बदलीच्या जाचक अटींमुळे अनेक शिक्षकांवर संसार मोडण्याची वेळ आली. त्यामुळे शिक्षकांमध्ये यावरून फारच नाराजीचे वातावरण होते. आंतरजिल्हा बदलीकरिता शासनाने अनिवार्य केलेले सेवेत कायम केल्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी शिक्षकांना तब्बल 25 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेसह काही इतर शिक्षक संघटनांनी यासाठी शासन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन निवेदने दिली. त्याचीच दखल घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 4 हजार 327 शिक्षकांना आज (ता. 6) स्थायित्व प्रमाणपत्र पाठविले. या प्रमाणपत्रांची पीडीएफ यादी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ती मागणीदेखील शिक्षण विभागाने पूर्ण केली. याबद्दल संघटनेने शिक्षण विभागाचे आभार व्यक्‍त केले. या प्रमाणपत्रामुळे शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे.