रात्रभर दारूविक्रेने तळीराम सुखावले

रात्रभर दारूविक्रेने तळीराम सुखावले

गोंदिया - सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्हावासी सज्ज झाले आहेत. थर्टी फर्स्टला मद्यविक्रीची दुकाने पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याला शासनाने मंजुरी दिल्याने तळीरामांच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. या दिवशी कोट्यवधी रुपयांची दारू तळीरामांच्या घशात जाणार आहे. मद्याची मागणी पाहता, मद्यविक्रेतेही दारूचा साठा जमविण्यात व्यस्त आहेत.

२०१६ या वर्षाचा उद्या, शनिवार शेवटचा दिवस. वर्षभरात जे घडले ते विसरून जाऊन प्रत्येकजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज झाला आहे. तरुणाईचा आनंद ओसंडून वाहत आहे. शिवाय शेतकरी, शेतमजूर, व्यापारीदेखील आपापल्यापरीने या वर्षाला अखेरचा निरोप देणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप कसा द्यायचा, याची आखणी तरुणाई करण्यात व्यस्त आहे. 

पार्ट्यांचा बेत आखतानाच मांसाहार व दारूचा पूरही मोठ्या प्रमाणात वाहणार आहे. मद्यविक्रीला पहाटे पाचपर्यंत शासनाने मंजुरी दिल्याने मद्यविक्रीची दुकाने रात्रभर सताड उघडी राहणार आहेत. ब्रॅण्डेड दारूला मद्यपींची अधिक पसंती आहे. असे असले तरी, मोहफुलाची दारूही अनेकांची तलफ भागविण्यासाठी सज्ज आहे. या दिवशी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलिस ठाण्यांसोबतच वाहतूक पोलिसांची या दिवशी रात्रभर गस्त राहणार आहे. सर्व पोलिसांना ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’वर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी पोलिसांचा कडा पहारा राहणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून विशेष बंदोबस्त राहणार आहे. तसेच नाकाबंदीसुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

पोलिसांची राहील करडी नजर 
थर्टी फर्स्टच्या दिवशी दारूडे बेभान होऊन कधी ट्रीपलशीट वाहने चालवीत असतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्‍यता अधिक असते. शिवाय जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा लागून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा जिल्ह्यात येण्याची शक्‍यता आहे. 
या दारू पुरवठ्यावर पोलिसांची नजर राहणार आहे. भरारी पथके याकरिता स्थापन करण्यात आली आहेत.

मद्यविक्रीच्या वेळेत सूट
विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान (एफएल-२) रात्री १०.३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एफएलडब्ल्यू-२ व एफएलबीआर-२ हा परवाना असलेली मद्याची दुकाने रात्री १ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सीएल-३ मद्याची दुकाने ‘क’ वर्ग नगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात (कॅंटोनमेंट वगळून) रात्री १० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत आणि त्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रात रात्री १२ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच नमूद दिवशी ई-परवाना असलेले एफएल-३, एफएल-४, ई-२, नमुना ई (बिअरबार) पहाटे ५ वाजेपर्यंत खुले राहतील, असे राज्य उत्पादनशुल्क विभागाचे अधीक्षक एन. के. धार्मिक यांनी कळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com