विद्युत धक्‍क्‍याने वाघाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नागभीड (जि. चंद्रपूर) - तालुक्‍यातील विलम येथील शेतशिवारात आज, गुरुवारी जमिनीत पुरलेला वाघाचा मृतदेह आढळला. हा मृत वाघ कऱ्हांडला अभयारण्यातील बेपत्ता श्रीनिवासन (अधिकृत क्रमांक टी-10) असल्याची माहिती आहे. 

नागभीड (जि. चंद्रपूर) - तालुक्‍यातील विलम येथील शेतशिवारात आज, गुरुवारी जमिनीत पुरलेला वाघाचा मृतदेह आढळला. हा मृत वाघ कऱ्हांडला अभयारण्यातील बेपत्ता श्रीनिवासन (अधिकृत क्रमांक टी-10) असल्याची माहिती आहे. 

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील "श्रीनिवासन' नामक वाघ 19 एप्रिलपासून बेपत्ता होता. वनविभागाने त्याचा शोध घेतला असता नागभीड तालुक्‍यात त्याचा कॉलर आयडी सापडला. तो याच परिसरात असल्याची खात्री पटल्यानंतर शोधमोहिमेला वेग आला. आज विलम गावाजवळ वाघाचा मृतदेह आढळला. महादेव इरपाते यांच्या शेताच्या कुंपणात सोडलेल्या विजेच्या स्पर्शाने त्याचा मृत्यू झाला. इरपाते यांच्या शेतात सध्या उन्हाळी भातपीक आहे. हे पीक फस्त करण्यासाठी रानडुक्कर शेतात येतात. त्यांच्याच मागावर हा वाघ आला आणि विजेच्या स्पर्शाने त्याचा मृत्यू झाला. इरपाते 19 एप्रिलला शेतात गेले तेव्हा शेतात त्यांना वाघ मृतावस्थेत आढळला. त्यांच्यासोबत शुभम उईके नामक व्यक्तीसुद्धा होते. दोघांनी शेतात खड्डा खोदून वाघाला पुरले. तत्पूर्वी, वाघाचा ठावठिकाणा कुणाला माहिती होऊ नये यासाठी त्याच्या गळ्यातील कॉलर आयडी काढून ती दुसरीकडे नेऊन टाकली. 

श्रीनिवासनच्या हालचाली बंद झाल्याचे कऱ्हांडला वनविभागाच्या लक्षात आले. त्यांनी शोधमोहीम राबविली असता ही घटना उघड झाली. वनाधिकाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. महादेव इरपाते यांच्यासोबत आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृत वाघ श्रीनिवासनच आहे की अन्य याचा शोध घेतला जात आहे. 

फोटो गॅलरी