शहरातील टॉप टेन लढती 

शहरातील टॉप टेन लढती 

नागपूर - यंदाची महापालिकेची निवडणूक भाजप आणि कॉंग्रेसचे अनेक उमेदवार तसेच नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा मतदारसंघ वाटून घेतले आहेत. फक्त आपल्याच समर्थकांना त्यांना विजयी करायचे आहेत. या माध्यमातून त्यांना स्वतःची ताकद दाखवून द्यायची आहे. भाजपने उमेदवारी वाटप करताना अनेक निष्ठावंत तसेच स्वयंसेवकांना नाराज केले आहे. अनेकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. खासकरून कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, नरेश गावंडे, भाजपचे बाल्या बोरकर, बंडू राऊत, शिवसेनेचे मंगेश काशीकर, अनिल धावडे, भाजपच्या बंडखोर विशाखा जोशी, प्रसन्न पातुरकर अशा उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

प्रभाग 37 
शहर कॉंग्रसचे अध्यक्ष तसेच महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने दिलीप दिवे यांना रिंगणात उतरविले आहे. मागील निवडणुकीत दोघांमध्ये चांगलीच चुरशीची लढत झाली होती. यंदा कोण कोणाला मात देतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ठाकरे यांचे राजकीय भवितव्यसुद्धा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. 

प्रभाग 19 
महापालिकेतील भाजपचे सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांचा सामना कॉंग्रेसचे तौफिक हुसेन यांच्याशी होत आहे. मात्र येथे संघाचे स्वयंसेवक श्रीपाद रिसालदार यांनी बंड पुकारले आहे. त्यांना स्वयंसेवक किती साथ देतात, त्यांचे नारळ कोणाला पाणी पाजते यावरच तिवारींचे राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. 

प्रभाग 15 
संघाच्या तालमीत तयार झालेल्या दोन तगड्या स्वयंसेवकांनी येथे थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. बड्या नेत्यांनी लादलेले उमेदवार पाडायचेच, असा संकल्प त्यांनी केला आहे. याशिवाय तिकीट नाकारल्याने भाजपच्या नगरसेविका यांनीही आपले पॅनेल उभे केले आहे. मुख्यमंत्र्यांचे घर याच प्रभागात आहे. यामुळे भाजपसाठी परीक्षेची घडी आहे. 

प्रभाग 38 

विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना आव्हान देणारे कॉंग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांच्यासाठी यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. स्वतःच्या पक्षातील नेत्यांची तोंडे त्यांना बंद करायची असेल तर निवडणूक जिंकणे आवश्‍यक आहे. नेहमीप्रमाणे यंदाही भाजपचे विजय राऊत यांच्याशी त्यांचा सामना होत आहे. 

प्रभाग 31 

उपमहापौर सतीश होले विरुद्ध कॉंग्रेसचे प्रशांत धवड आणि माजी उपमहापौर रवींद्र भोयर विरुद्ध कॉंग्रेसचे गुड्डु तिवारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. चार बडे नगरसेवक एकाच प्रभागात लढत आहेत. भविष्यातील दक्षिण नागपूरचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. यामुळे चौघांच्याही राजकीय भवितव्याची ही निवडणूक राहणार आहे. 

प्रभाग 13 

भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या पत्नी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या पत्नी येथे लढत आहे. दोन्ही आमदार आपल्या परिसरात प्रचंड लोकप्रिय आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत कधीच पराभूत झाले नाहीत. मात्र यंदा त्यांच्या पत्नी रिंगणात आहेत. मतदार त्यांना पसंती देतात की घरी बसवतात, याची उत्सुकता आहे. 

प्रभाग 18 

महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. विशेषतः बंडू राऊत यांच्या उमेदवारीला भाजप आणि संघातून प्रचंड विरोध होता. ही जागा खुल्या प्रभागाच्या उमेदवाराला देण्याची मागणी होती. पक्षाने ती फेटाळली. ही नाराजी कितपत दूर होते यावरच राऊत यांचे भवितव्य अवलंबून राहील. 

प्रभाग 22 

भाजपने उमेदवारी नाकारल्याने नगरसेवक अनिल धावडे यांनी शिवधनुष्य हाती घेतले आहे. दुसरीकडे स्वयंसेवक श्रीकांत आगलावे यांची शेवटच्या क्षणी उमेदवारी कापण्यात आल्याने येथे भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. स्वयंसेवकांच्या भांडणात चाफले यांना उमेदवारीची लॉटरी लागली. मात्र येथे भाजपमध्येच आपसात सामना होत आहे. 

प्रभाग 23 

तब्बल दहा वर्षांनंतर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर आणि माजी महापौर नरेश गावंडे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गावंडे आपल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांना कॉंग्रेसवाले कितपत साथ देतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच निवडणुकीवर गावंडे यांचे राजकीय पुनरुज्जीवन अवलंबून आहे. 

प्रभाग 1 
मुख्यमंत्र्यांचे खासमखास समजले जाणारे विक्की कुकरेजा प्रथमच महापालिकेची निवडणूक लढत आहेत. सिंधी समाजाचे प्राबल्य असलेल्या या प्रभागात कॉंग्रेसचे सुरेश जग्यासी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वेदप्रकाश आर्य हेसुद्धा एकात गटातून लढत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com