अडीच महिन्यांत सहा लाख क्विंटल धानखरेदी

अडीच महिन्यांत सहा लाख क्विंटल धानखरेदी

भंडारा - जिल्ह्यात यावर्षी २४ ऑक्‍टोबरला शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्र सुरू झाले. सातही तालुक्‍यांतील ६१ आधारभूत केंद्रांवर ३ जानेवारीपर्यंत अडीच महिन्यांच्या कालावधीत  ६ लाख ३३ हजार १७१ क्विंटल धान आतापर्यंत खरेदी करण्यात आले. 

खरीप हंगामात भरपूर उत्पादन झाल्याने धानविक्रीचा वेग वाढला. परंतु, खरेदी केंद्रावरील गोदाम तुडुंब भरले असून, शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहे. परिणामी बऱ्याच केंद्रांनी धानखरेदी थांबविल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. 

यावर्षी शासनाने नियोजित वेळेपेक्षा एका सप्ताहापूर्वीच धानखरेदीला प्रारंभ केला होता. त्याचे चांगले परिणाम सध्या दिसत आहेत. जिल्ह्यात आजघडीला ६१ खरेदी केंद्रे सुरू आहेत. दरवर्षी १ नोव्हेंबरपासून आधारभूत खरेदी केंद्रे सुरू केले जातात. मात्र, यावर्षी आठवड्यापूर्वीच खरेदीला प्रारंभ करण्यात आला. गेल्या काही वर्षातील धानखरेदीचे कमिशन तसेच गोदामाच्या भाड्यापोटी मिळणारी रक्कम थकीत आहे. त्यामुळे काही तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था आणि सहकारी भातगिरण्यांनी केंद्र सुरू करण्यास नकार दिला होता. परंतु, यासंदर्भात सकारात्मक तोडगा निघाला असून, लवकरच हा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक संस्थांनी धानखरेदी केंद्रे सुरू केली आहेत.

मागील वर्षी ५७ केंद्रांद्वारे धानखरेदी करण्यात आली होती. ही संख्या यावर्षी चारने वाढली आहे. काही संस्थांनी गोदामाचे भाडे व कमिशन या मुद्द्यावरून केंद्रे सुरू करण्यास नकार दिला होता. परंतु, शेतकरी हितापोटी त्यांनी गोदाम भाड्याने देऊन केंद्रे सुरू करण्यास मंजुरी दिली. या ६१ केंद्रांवर ३ जानेवारीपर्यंत १७ हजार ६५ शेतकऱ्यांकडून ६ लाख ३३ हजार १७१.५५ क्विंटल साधारण (ब ग्रेड) धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्याबदल्यात ९३ कोटी ७ लाख ६२ हजार १७९ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेमार्फत अदा करण्यात आले. 

भंडारा तालुक्‍यात २९७ शेतकऱ्यांनी ११ हजार ८७९.२०, क्विंटल, मोहाडी तालुका १ हजार २२ शेतकऱ्यांनी ३८ हजार ९०८.३०, तुमसर तालुका ३ हजार ५७९ शेतकऱ्यांनी १ लाख २९ हजार १२५, लाखनी तालुका ४ हजार ६९ शेतकऱ्यांनी १ लाख ३० हजार ४८.७५, साकोली तालुका ३ हजार ४७४ शेतकऱ्यांनी १ लाख २८ हजार १७०.७०, लाखांदूर तालुका ३ हजार २२० शेतकऱ्यांनी १ लाख ३० हजार ५२२.६०, पवनी १ हजार ३९४ शेतकऱ्यांनी ६४ हजार ५७७ क्विंटल असे एकूण ६ लाख ३३ हजार १७१.५५ क्विंटल धान खरेदी केंद्रांवर विकले. 

गोदामाची संख्या अपुरी, धान उघड्यावर 
मार्केटिंग फेडरशनद्वारे नियुक्त संस्था सबएजंट म्हणून धानखरेदी करतात. यात सहकारी व खासगी संस्थांचा सहभाग आहे. या संस्थेद्वारे शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी केली जाते. परंतु, धान ठेवण्यासाठी पुरेसे गोदामे नाहीत. यावर्षी जिल्ह्यात १०० गोदामे भाड्याने घेण्यात आली. तरीही गोदामांची संख्या अपुरी पडत आहे. उपलब्ध गोदामात धान ठेवण्यास जागा नाही. 

त्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहे. सानगडी येथील आदर्श सहकारी धानगिरणीद्वारे सुरू असलेले केंद्र गेल्या २० ते २२ दिवसांपासून बंद आहे. मैदानात उघड्यावर पडून असलेल्या धानाची प्राण्यांसह उंदीर, घुशीही नासाडी करीत आहेत. या राइसमिलची तिन्ही गोदामे हाउसफुल्ल झाली आहेत. धानाचे उत्पादन वाढल्याने यावेळी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान विक्रीसाठी आणत आहेत. साकोली येथील श्रीराम भातगिरणीची पाचही गोदामे भरल्याने तूर्तास धानखरेदी थांबविण्यात आली. ३१ मार्चपर्यंत धानखरेदी सुरू राहणार आहे. दरम्यान, गोदामाची साठवण क्षमता संपल्याने आधारभूत केंद्रावर खरेदी केलेले धान साठविण्यासाठी व्यवस्था नाही. परिणमी शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. 

दरम्यान, धान भरडाईचे कंत्राट घेतलेल्या राइस मिलर्स कडूनही धानाची उचल करण्यास दिरंगाई केली जात आहे. धानखरेदी आणखी काही दिवस बंद राहिल्यास पुन्हा शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे धाव घ्यावी लागणार आहे.

जुने भाडे थकीत 
गेल्या सहा वर्षांपासून संस्थांनी भाड्याने घेतलेल्या गोदामाचे भाडे शासनाने दिलेले नाही. दरवर्षी धानखरेदी केंद्र सुरू करताना या विषयावर चर्चा केली जाते. परंतु, अद्याप थकीत भाड्याचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. शिवाय भाड्याचे दर वाढवून देण्यात यावे, अशीही गोदाममालकांची मागणी होती. परंतु, तीसुध्दा अपूर्णच आहे. गोदामे फुल्ल झाल्याने अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांकडून धानखरेदीला ब्रेक लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com