वॉटरपार्कमध्‍ये बुडून दोघांचा मृत्‍यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नागपूर - मित्रांसोबत जलतरणातील कृत्रिम लाटेचा आनंद लुटण्यासाठी गेलेले आठ तरुण पाण्यात बुडाले. अन्य युवकांनी तातडीने मदत केल्यामुळे आठपैकी पाच तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, दोघांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला, तर आणखी एकाचा खासगी रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. ही दुर्दैवी घटना आज रविवारी दुपारी एकला उत्तर अंबाझरी मार्गावरील एका वॉटर पार्कमधील स्वीमिंग पूलमध्ये घडली. 

नागपूर - मित्रांसोबत जलतरणातील कृत्रिम लाटेचा आनंद लुटण्यासाठी गेलेले आठ तरुण पाण्यात बुडाले. अन्य युवकांनी तातडीने मदत केल्यामुळे आठपैकी पाच तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, दोघांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला, तर आणखी एकाचा खासगी रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. ही दुर्दैवी घटना आज रविवारी दुपारी एकला उत्तर अंबाझरी मार्गावरील एका वॉटर पार्कमधील स्वीमिंग पूलमध्ये घडली. 

या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे अक्षय बिंड (वय १९, रा. चितारओळी, महाल) आणि सागर गंगाधर सहस्रबुद्धे (वय २०, रा. लुम्बिनीनगर, जरीपटका) अशी आहेत. स्नेहल मोरघडे (वय १९) यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दीपक गजभिये, नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले या युवकांना वेळीच मदत मिळाल्यामुळे ते बचावले. 

अंबाझरी मार्गावर असलेल्या वॉटरपार्कमध्ये रविवारी चांगली गर्दी असते. दुपारी येथील जलतरणातील पाण्यात समुद्राप्रमाणे कृत्रिम लाटांची निर्मिती करण्यात येते. समुद्रातील लाटाप्रमाणे या कृत्रिम लाटांसोबत खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी दुपारी महिला, युवती, युवक आणि लहान मुलेसुद्धा येतात. उंच कृत्रिम लाटेत सागर सहस्रबुद्धे, अक्षय बिंड, स्नेहल मोरघडेसह अन्य तरुण जलतरणाच्या तळाशी गेले. तिघेही बुडाल्याचे लक्षात येताच येथे उपस्थित काही तरुणांनी पाण्यात उड्या घेऊन तिघांनाही बाहेर काढले.  

मृतदेह हलविण्यास नकार, तणाव 
अक्षय आणि सागरच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांचे नातेवाईक वोक्‍हार्ट रुग्णालयात पोहोचले. दरम्यान, पोलिस पथक शवविच्छेदनासाठी मृतदेह हलविण्याची तयारी करीत होते. नातेवाइकांनी पोलिसांना मृतदेह हलविण्यास अटकाव केला. मृत्यूस जबाबदार असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.

...तर टळली असती घटना
एक ३० वर्षीय महिला स्वीमिंग पुलाच्या लाटेत अडकली होती. तिला लाइफगार्डने उडी मारून वाचविले होते. त्यानंतर व्यवस्थापनाने लाटा निर्माण करणारी विद्युत मोटर बंद करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, युवकांच्या हट्टामुळे पुन्हा लाटा निर्माण करणारी मोटार सुरू करण्यात आली. जर मोटार बंद केली असती, तर ही घटना टळली असती.

क्रेझी कॅसल तत्काळ बंद - जिल्हाधिकारी 
रविवारी क्रेझी कॅसलमध्ये घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. पोलिस चौकशी करीत आहेत. त्या आधारावर प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येईल. घटनेच्या पार्श्‍वभूमीवर हा पार्क तत्काळ बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी सांगितले.

स्‍वीमिंग पूलमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना गंभीर असून घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात येईल. स्‍वीमिंग पूलच्या लीजबाबतही आदेश न पाळल्यामुळे कारवाई करण्यात येईल.
- नंदा जिचकार, महापौर

Web Title: two death in water park nagpur news