मनपाच्या अभियंत्यासह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

नागपूर - भूखंडावर घराच्या बांधकामास मंजुरी देण्यासाठी 16 हजारांची लाच घेणाऱ्या मनपाच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. हा छापा सोमवारी दुपारी चार वाजता लक्ष्मीनगर झोन कार्यालयात केला. रामचंद्र रघुनाथ हटवार (वय 52) आणि संजय माणिक शेंडे (वय 42) अशी अटक केलेल्या लाचखोरांची नावे आहेत.

नागपूर - भूखंडावर घराच्या बांधकामास मंजुरी देण्यासाठी 16 हजारांची लाच घेणाऱ्या मनपाच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. हा छापा सोमवारी दुपारी चार वाजता लक्ष्मीनगर झोन कार्यालयात केला. रामचंद्र रघुनाथ हटवार (वय 52) आणि संजय माणिक शेंडे (वय 42) अशी अटक केलेल्या लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदार यांचा धोटे ले-आउट, जुनी अजनी येथे दोन भूखंड आहेत. त्या भूखंडावर त्यांना घर बांधायचे आहे. त्यामुळे त्यांनी मनपाच्या झोन क्र. 1, लक्ष्मीनगरातील कार्यालयात रीतसर अर्ज केला. त्यांचा अर्ज निकाली काढण्याऐवजी कनिष्ठ अभियंता रामचंद्र हटवारने त्याला दोन भूखंडाचे प्रत्येकी दहा हजार असे एकूण 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच न दिल्यास सहा महिने मंजूर देणार नाही, तसेच बांधकामही होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने एका नातेवाइकाकडे कैफियत मांडली. नातेवाइकांसह हटवार यांची भेट घेत हातपाय जोडून विनंती केली असता लाचेची रक्‍कम 16 हजारापर्यंत त्याने आणली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी 15 मे ला एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. एसीबीने खातरजमा केल्यानंतर आज सोमवारी दुपारी सापळा रचला. मनपाच्या लोककर्म विभागातील लक्ष्मीनगर झोन कार्यालयात एसीबीचे अधिकारी दबा धरून बसले. तक्रार कार्यालयात येताच "पैसे आणले का? अशी विचारणा हटवारने केली. तक्रारदाराने होकार दिल्यानंतर ते पैसे संजय शेंडे या दलालाकडे देण्याची सूचना त्याने केली. संजयने पैसे स्वीकारताच एसीबी अधिकाऱ्यांनी छापा घालून दोघांनाही अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मोनाली चौधरी, भावना धुमाळे, प्रवीण पडोळे, रविकांत दहाट, शालिनी जांभूळकर, रेखा यादव, शिशुपाल वानखडे यांनी केली.

शौचालयात लपला हटवार
दलाल संजय शेंडे याला एसीबीने अटक केल्याचे कळताच कनिष्ठ अभियंता रामचंद्र हटवार याने कार्यालयातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी घेराव घातल्यामुळे त्याला पळता आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या धाकामुळे हटवार एका शौचालयात जाऊन लपला. शेवटी पोलिसांनी त्याला शौचालयातून ओढून बाहेर काढून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.