विद्यापीठ देणार परीक्षा केंद्रांना मोबाईल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये ‘आयटी रिफॉर्म’ आणला. आता परीक्षांसोबतच परीक्षा केंद्रालाही अद्ययावत करण्याचे काम विद्यापीठाने सुरू केले आहे. लॅपटॉप, फोटोप्रिंटरनंतर आता विद्यापीठ केंद्रांना मोबाईल देणार आहे. तसा प्रस्ताव लवकरच परीक्षा मंडळाच्या बैठकीत ठेवणार आहे. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये ‘आयटी रिफॉर्म’ आणला. आता परीक्षांसोबतच परीक्षा केंद्रालाही अद्ययावत करण्याचे काम विद्यापीठाने सुरू केले आहे. लॅपटॉप, फोटोप्रिंटरनंतर आता विद्यापीठ केंद्रांना मोबाईल देणार आहे. तसा प्रस्ताव लवकरच परीक्षा मंडळाच्या बैठकीत ठेवणार आहे. 

विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १७४ केंद्रांवर हिवाळी आणि उन्हाळी परीक्षा घेण्यात येते. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी विद्यापीठाने परीक्षा केंद्रावर ‘ऑनलाइन पेपर डिलेव्हरी’ पद्धतीने पेपर देण्याचा निर्णय घेतला. यावर्षीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे  परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांनी प्रिंटर, झेरॉक्‍स मशीन आणि त्यासाठी लागणारा विद्युत खर्चही देण्याची मागणी केली. 

गत महिन्यात विद्यापीठाने प्रिंटर आणि झेरॉक्‍स मशीनसह लॅपटॉपही देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत १०० केंद्रांना झेरॉक्‍स मशीन आणि फोटो प्रिंटर देण्यात आले आहेत. शिवाय पन्नासाहून अधिक महाविद्यालयांना लॅपटॉप देण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्रावर वेळोवेळी सूचना देण्यासाठी परीक्षा विभागाला प्राचार्य वा इतर प्राध्यापकाचा मोबाईल क्रमांक ठेवावा लागतो. मात्र, प्रत्येकवेळी केंद्रावरील निरीक्षक बदलल्यावर त्या केंद्रावर सूचना देण्यासाठी महाविद्यालयातून नवा क्रमांक मागविला जातो. यामुळे परीक्षा विभागाला बराच त्रास होतो. त्यामुळे मोबाईल कंपनीशी ‘टाय-अप’ करून विशिष्ट ‘मोबाईल सीम’ आणि शेवटले एक दोन वा तीन ‘डिजिट’ केंद्राच्या क्रमांक ठेवण्याचे परीक्षा नियंत्रकांनी ठरविले आहे. 

हा  मोबाईल प्रत्येकवेळी जो प्रमुख असेल त्याच्याकडे देण्यात येईल. त्यामुळे विशिष्ट क्रमांकावर संदेश वा सूचना दिल्या जाईल. विद्यापीठात ही प्रक्रिया करण्यासाठी परीक्षा मंडळाची मान्यता आवश्‍यक आहे. ती मान्यता मिळाल्यावर मोबाईल कंपनीशी बोलणी करण्यात येईल. पुढल्या परीक्षांपर्यंत ही योजना कार्यान्वित होणार आहे.

परीक्षेच्या कामात वेळोवेळी केंद्रांना सूचना द्याव्या लागतात. त्यामुळे जो क्रमांक नोंदणीकृत आहे, त्यावर द्यावा लागतो. अनेकदा हा क्रमांक बदलल्यावर केंद्रांना सूचना मिळत नसल्याने आता एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल. तसेच ‘हॅण्डसेट’ दिला जाईल. त्यामुळे माणूस बदलला तरी क्रमांक कायम राहणार आहे. याचा फायदा परीक्षा विभागाला होईल. 
- डॉ. नीरज खटी, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

Web Title: university gives mobile to exam center